“ सर, मी सात वर्षाची असताना लग्न झालं. आता मला समजतंय, मी कमवतेय. मला नकोय तो नवरा. मी नाही सांगीतलं, पण समाज ऐकत नाही. मला आता शिकायचंय, मोठं व्हायचंय. ” दुर्गी शिर्के सांगत होती. दुर्गी संघर्ष करतेय स्वत : च्या ओळखीसाठी, नवीन आयुष्यासाठी. अशा अनेक दुर्गी आपल्या आसपास आहेत. आपण उगीचच सगळं काही ठीक चाललंय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलंच राज्य आलंय, लोकशाही आलीय, समस्या सुटू लागल्यायत या आनंदात जगतोय की काय असं वाटतं कधी कधी. दुर्गी शिर्के सध्या नोकरी करतेय. तिचा नवरा दारूडा आहे. तिला त्याच्या सोबत जायचं नाहीय, हे लग्नच मान्य नाहीय. पण ती सांगणार कुणाला, तिचं ऐकणार कोण, हा प्रश्न आहे. साहेब, आमची चूक झाली, पण आता आम्हाला त्या मुलाबरोबर पोरीला नांदवायची नाहीय. तो रोज दारू पिऊन दारावर येतो. गोंधळ घालतो. आम्हाला काय करावं सूचत नाहीय. दुर्गीची आई सांगत होती. दुर्गीची संपूर्ण कहाणी एका जिल्हाधिकारी असलेल्या मित्राला सांगून मदतीसाठी पुढची यंत्रणा जोडून दिली. पोलीसांकडून पण मदत मिळेल अशी व्यवस्था लाऊन दिली. हे सर्व होत असतानाच संध्याकाळी राष्ट्रसेवादलाची कार्यकर्ता असलेल...