Skip to main content

Open letter to Sharad Pawar

मा. शरद पवार,
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस.

पत्र लिहिण्यास कारण की तुमच्या सध्याच्या राजकारणावरून मला काही प्रश्न पडलेयत. नेहमीप्रमाणे साहेबांना सर्व माहित असतं असं तुमच्या भक्तांकडून कळलं आणि विचार केला की थेट तुम्हालाच हे प्रश्न विचारावेत.
तुम्ही सतत बेरजेचे राजकारण करत आलात, त्यामुळे तुमच्या राजकारणाचा आवाका कुणालाच लक्षात आला नाही. बेरीज करता करता तुम्ही इतके पुढे गेलात की नेमकं तुम्ही काय काय जोडलंय हे ही तुमच्या लक्षात राहिले नसावं. अर्थात यालाही तुमचे भक्त आक्षेप घेतील. साहेबांना सर्व माहित असतं, आणि त्यांच्या लक्षात सर्व असतं अशी त्यांची पक्की धारणा आहे.
असो, तो काही आपला विषय नाही. गेली अनेक वर्षे तुम्ही राज्यातील पुरोगामी राजकारणाचा चेहरा आहात. संघ परिवारावर थेट, आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुरोगामी चळवळीतले लाखों कार्यकर्ते, कुठेच काही नाही झालं तर आहेत पवार साहेब, म्हणत थेट तुमच्या दारात यायचे. तुम्ही ही मोठ्या मनाने त्यांना सामील करून घेतलं. तुमचा पक्ष वाढत गेला. मग हळूहळू हा पक्ष नसून टोळी आहे असा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला. तुमच्यावरचा हल्ला म्हणजे पुरोगामीत्व, धर्मनिरपेक्षतेवरचा हल्ला माणून शेकडो कर्यकर्ते विरोधी पक्षांसोबत लढले. तुमचा पुरोगामी चेहरा आणि सर्वसमावेशक राजकारण करण्याची हातोटी यामुळे वांद्र्यात तुम्ही खाल्लेल्या माशांचे काटेही कार्यकर्त्यांनी आनंदाने, मोठ्या मनाने पचवले.
अर्ध्या चड्डीवरच्या तुमच्या रागामुळे म्हणा किंवा चड्डीशी तडजोड न करण्याच्या भूमिकेमुळे तुम्ही अनेकांच्या गळ्यातले ताईत बनून गेलात. कालांतराने अर्ध्या चड्डीचं फुलपँटमध्ये रूपांतर झालं आणि नंतर लोकांच्या लक्षात आलं की ही फुलपँट घसरू नये म्हणून लावलेला बेल्ट तुमचाच आहे. मग,पँट घसरल्याने लाज जाऊ नये म्हणून उदात्त भावनेने तुम्ही हे बेल्टचं काम स्वीकारलं अशी भावना करून घेऊन तुमचे भक्त सुखावले. बाहेर सांगू लागले, साहेब आहेत म्हणून सुरू आहे सगळं.
असो, माझा विषय वेगळाच आहे. सेक्युलरीजम वगैरे वगैरे च्या नावाखाली आयुष्य काढल्यानंतर, बाबरीकांडानंतर झालेल्या हिंसाचाराचे प्रत्यक्ष साक्षीदार राहिल्यानंतर, संघाशी लढाई ही वैयक्तिक नसून सैद्धांतिक लढाई जाहीर केल्यानंतरही तुम्ही या देशातील लोकशाही, पुरोगामीत्व, निधर्मीवाद य सर्वांना छेद देऊ पाहणाऱ्या विचारधारेला बळकट करण्याचं काम करत बसलात.
या विचारधारेशी लढायचं की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असू शकत नाही. तुम्ही आजपर्यंत समाज जीवनात जसं वावरलात, वागलात त्यातून निर्माण झालेल्या या अपेक्षा आहेत.
संघाच्या विचारधारेशी दोन हात करायची ऐतिहासिक जबाबदारी चालून आलेली असताना, तुम्ही नेमकं ती विचारधारा बळकट कशी होईल याचा प्रयत्न करत बसलायत.
तिकडे तुमच्या टोळीने काय उच्छाद मांडला, हे बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही गप्प बसलायत अशी पण मार्केट मध्ये चर्चा आहे. तुमचे बहुजन समाजास आधारू असेलले माळी समाजाचे लोकप्रिय नेते छगन भुजबळ, रमेश कदम जेल मध्ये आहेत. बाकीचे कधीही जाऊ शकतील. साहेब आजपर्यंत निष्कलंक सामाजिक राजकीय आयुष्य जगले असा तुमच्या भक्तांचा दावा फोल ठरवण्यासाठी म्हणून की काय तुमच्या परिवारातल्याच जवळच्या लोकांवर आरोप झाले. खरं खोटे तुम्हालाच माहित.
आज देशातील सरकार सतत वेगवेगळे निर्णय घेतंय. या देशातील गरीब- कमजोर घटकाला श्रीमंत करायचं स्वप्न दाखवून सरकार सरकारने एकप्रकारची आर्थिक आणीबाणी लादली. एखादा भोंदू बाबा चमत्कार करण्याचा प्रचार करून लोकांना लुबाडतो तसं काहीसं चित्र देशात दिसलं. अशा लुबाडणुकीबाबत कुणाची सहसा तक्रार नसते. कारण आपण गंडलं गेलोय, हे लोकांना कसं सांगणार हा मुद्दा असतो. अशा वेळी कुणी तरी दीपस्तंभासारखी भूमिका घ्यायची असते. अपेक्षा ही होती की तुम्ही गरीब- सामान्य माणसाचं दुखणं मांडाल. आर्थिकदृष्ट्या असहाय्य झालेला माणूस कुणाशी कसा लढेल? खरं तर सामान्य माणूस लढून शकणार नाही. दु:ख या गोष्टीचं वाटतंय की आपण ही लढला नाहीत. #rcode
अतिशयोक्ती वाटेल पण, कन्हैय्याच काय पण राहुल गांधी सुद्धा त्यांना झेपेल तेवढी इतिहासाने सोपवलेली जबाबदारी पार पाडत आहेत. तुम्ही मात्र 'आतले की बाहेरचे' ते न कळल्यामुळे नेमकं साहेबांचं धोरण काय? हे लोकांना कळतंच नाही. लोकांचं सोडा पण तुमच्या टोळीलाही हे समजलेले नाही. लोक म्हणतात पैसा आणि मसल पॉवर असल्याशिवाय तुमच्या पक्षात प्रवेशंच मिळत नाही. त्याच तुमची रित अशी की पक्षाने मोर्चा काढायचा, मग तुम्ही त्याआधी चर्चेला दिल्लीला जायचं. बँका- कारखाने अडचणीत आले की तुम्ही थेट पंतप्रधान- अर्थमंत्र्यांशी बोलायचं. पण प्रश्न हा आहे की, इथे विचारधारा धोक्यात आलेली असताना तुम्ही गप्प का?
बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून, निदान नागपूरला जाऊन मोहन भागवतांना भेटा. त्यांना सांगा मुख्यमंत्री स्टेजवर असताना हिंदूंना दहा दहा पोरं काढायचे सल्ले देण्यापासून संत- महंताना रोखा, यामुळे 'मान न मान, मैं तेरा मेहमान' सरकार धोक्यात येईल. त्यांना सांगा अश्या चमत्कारी 'माळा' मुख्यमंत्र्यांच्या बायकोला काढून देत जाऊ नका. दुष्काळामुळे राज्यातल्या शेकडों महिलांनी आपले दागिने, मंगळसूत्र गहाण ठेऊन शेतीसाठी पैसा उभा केलाय. त्यांना सांगा हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचंच आहे. छत्रपतींचा आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्राला आहे, तिथे महाराजांच्या नावाचा जयघोष करण्याएवजी मोदी-मोदी ओरडणे शिवद्रोह आहे.
जमलं तर भागवतांना हे ही सांगा, भाजपेतर लोकं पाकिस्तानी नसतात. हिंदू नसलेले देशद्रोही नसतात. चाय पर चर्चा झाल्यानंतर दिलेली आश्वासनं पूर्ण करता आली नाहीत म्हणून गाय पर चर्चा नका करू. पवार साहेब, भागवतांना हे पण सांगा तुम्ही हाफ चड्डीतून फुलपँटमध्ये आलात म्हणून बायकांना बुरख्यात ढकलू नका.
अजूनही बरेच आहे साहेब,पण तुमचेच भक्त मला बोलले, जरा बेतानं सांगा, साहेबांना सर्वच माहिती असतं, म्हणून आवरतं घेतो. जर मोदी- आणि भागवत साह्यबांनी तुमचं नाहीच ऐकलं तर मग मामला साफ आहे. तुमचं घड्याळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे. वेळ आहे तोवर सेल बदलून टाका.
ता.क. - नाही म्हटलं तुम्हाला राग येईल म्हणून मघाशी बोललो नाही, पण सांगीतल्याशिवाय राहावत नाही. माझा जन्म झाला तेव्हा मुख्यमंत्री झाला होतात, तेव्हा तुमच्याच भाषेत सांगायचं तर मला तेवढा अधिकार नाही. पण आपलं कार्य फार मोठं होतं आणि आहे. या वयात व्यवहारासाठी विचारांशी तडजोड करू नका. फारच वाटलं तर तुम्हाला कोणी सांगणार नाही करायला, पण स्वत:हून यातून निवृत्त व्हा आणि नवीन पिढीला नेतृत्व सोपवा. त्यांनाही सांगा, सत्ता येते जाते, सत्तेसाठी विचारांशी तडजोड करू नका.

आपलाच,
रवींद्र आंबेकर

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्