Skip to main content

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्न करतेय. कर्तुत्व बहुजनांनी गाजवायचं आणि गुरू ब्राम्हणांनी व्हायचं, हा इतिहास रुजवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तो हाणून पाडला पाहिजे अशी भूमिका या पिढीची आहे. या नवीन पिढीला जसा इतिहास हवाय तो तसा सापडत नसल्याने इतिहासाच्या मुद्द्यांवरून वारंवार खटके उडताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र शाळेच्या पुस्तकातून जेवढं वाचलं त्यापलिकडे ऐकून असलेल्या पराक्रमांच्या गाथांवर सामान्य माणूस शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. त्यांच्या जडण-घडणीत ब्राम्हणांचा हात होता ही थिअरी जाणीवपूर्वक रूजवली गेली असा नव्याने इतिहास शोधत असलेल्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. हे कार्यकर्ते साधारणत: मराठा समाजातील असल्याने या वादाला एक राजकीय अंग सुद्धा आहे. जेम्स लेन याच्या पुस्तकानंतर उद्भवलेल्या वादानंतर याचा राजकीय लाभ ही मिळू शकतो याचा अंदाज आल्यानंतर निवडणूकांमध्ये शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील निर्माण झालेल्या वादाला वेगळं महत्त्व आलं आहे. जे राजकीय पक्ष या वादात सध्या आहेत ते या वादाचे राजकीय “बेनिफिशरी” आहेत. दादोजी कोंडदेवांचा इतिहास असो नाहीतर जिजाऊं बाबतचा उल्लेख.. महापुरूषांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याचा अधिकार कुणालाच नाही. याबाबतचं संशोधन ही कुणी करू नये अशी बहुजन समाजातील अनेक नेत्यांची इच्छा आहे. ती इच्छा रास्त मानली पाहिजे. शिवाजी महाराजांचा डीएनए हा राष्ट्रप्रेमाचा आहे, त्याचं ऍनालिसीस करण्याची हुक्की ज्यांना ज्यांना येते त्यांचा या वादाचा राजकीय फायदा घेण्याचा डाव आहे हे सहज ओळखावे. पुरंदरेंच्या निमित्ताने इतिहासाच्या जाणकार आणि बखर लेखकांमध्ये बरंच वादंग माजलंय. इतिहास न वाचलेले राजकीय पुढारी पण या वादात उतरलेयत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्यामुळे वाद आहे की बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार देताच कामा नये म्हणून... बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवशाहीर असणं किंवा शिवचरित्रकार असणं यावरून वाद आहे... असा प्रचंड गोंधळ सध्या सामान्य माणसाच्या डोक्यात सुरू आहे. पुरंदरेंना पुरस्कार देऊ नये अशी मागणी असेल तर आजवर पुरंदरेंना हा इतिहास मांडूच का दिला गेला? असे अनेक प्रश्न निर्माण झालेयत. पुरंदरेंचा इतिहास हा खरा इतिहास नाही असं मानणारा एक मोठा वर्ग आज दिसतोय. त्यामध्ये अनेक राजकीय नेते ही आहेत. जितेंद्र आव्हाड हे ही प्रामुख्याने दिसून येतात. जेम्स लेनच्या पुस्तकावरून उठलेल्या वादळाच्या वेळी ही जबाबदारी दिवंगत आर आर पाटील यांनी सांभाळली होती. आर आर पाटील यांनी संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांना शह दिला असं बोललं जायचं. जे काम राष्ट्रवादी काँग्रेसला उघडपणे करता येत नव्हतं ते – ते काम त्यावेळी संभाजी ब्रिगेडनं केलं. त्याचा राजकीय फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला जरूर मिळाला. यंदा ही जबाबदारी कुठल्यातरी मराठा नेत्यावर टाकण्याएवजी राष्ट्रवादी काँग्रेसनं जितेंद्र आव्हाड या बहुजन समाजातील नेत्यावर सोपवलीय. जितेंद्र आव्हाड एकदम जोराने आणि जोमाने मुद्दा मांडतात. आव्हाड यांच्या आक्रामकपणाला तोड नाही. मध्यंतरी अजित पवारांनी त्यांना दोन शब्द सुनावले पण शरद पवारांनी अजित पवारांचा अभ्यास नाही असं सांगून जितेंद्र आव्हाडांना पाठिशी घातलं. शरद पवारांनी ही बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे, पण पुरस्कार देण्याचा सरकारचा अधिकार मान्य केला आहे. मधल्या काळात सुप्रिया सुळे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक केल्याचं एक पत्र ही सोशल मिडीयावर व्हायरल झालं. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय याचा शोध ही अनेक इतिहास संशोधकांनी घ्यायला सुरूवात केलीय. बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा व्होटबँकेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली हे मात्र नक्की. राज्यात सध्या गंभीर दुष्काळ आहे. या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शरद पवार मराठवाड्यात गेले होते. उस्मानाबादमध्ये त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्यावर मत व्यक्त करून आगीत तेल ओतले आणि नंतर पुरस्काराच्या एक दिवस आधी वादावर पडदा टाकण्याचं आवाहन ही केलं. या वादाला मराठा अस्मितेचं राजकारणंच कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे. बाबासाहेबांना पुरस्कार जाहीर करण्यासाठी मंत्री विनोद तावडे यांनी बोलवलेली पत्रकार परिषद रद्द करून याची पावती तेव्हाच दिली होती. तावडे हे मध्यंतरीच्या काळात मराठा नेता म्हणून उदयाला येत आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकारपरिषद टाळून जो द्यायचा तो संदेश तेव्हाच दिला होता. फडणवीसांना पत्रक काढून बाबासाहेब पुरंदरेंचं अभिनंदन करावं लागलं. जातीचं राजकारण केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच करतंय अशातला भाग नाही. सरकार मधील ही अनेकांना या राजरकारणाचा फायदा मिळणार आहे. या वादामुळे दुष्काळी- अवकाळी ने ग्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना अस्मितेचा मुद्दा मिळालाय. घरात जेवायला नसलं तरी चालतं पण अस्मितेसाठी कुणाचं तरी ऑफिस तोडणं किंवा रस्ता अडवणं सोप्प असतं. ज्यांना रस्त्यावर उतरणं लाजीरवाणं वाटतं असे काही ब्राम्हण तर शिवाजी महाराज आज असते तर आव्हाडांना फाशीच दिली असती वगैरे मेसेज फॉरवर्ड करत बसलेयत. शिवसेना- भाजप आणि भाजप- शिवसेनेच्या सरकारला दोन्ही वेळा बाबासाहेब पुरंदरेंनी अडचणीत आणलंय. मागच्या वेळी जन्म तारखेच्या वादातही पुरंदरेंचा वाटा मोलाचा होता. तो वाद अजून निस्तरला गेलेला नाही, अशातच हा नवीन वाद ओढवून सरकारने आपल्या प्राथमिकता ही दाखवून दिल्यायत. खरं तर वादाचं निरसन होई पर्यंत बाबासाहेब पुरंदरे यांनी हा पुरस्कार स्वीकारणं योग्य नाही. संशयाच्या वातावरणात हा पुरस्कार देणं ही सरकारने टाळायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराज झाले नसते तर दादोजी कोंडदेवांचा इतिहास सांगीतला गेला असता का? जेम्स लेन सारख्यांना इतिहासाचे दाखले देणाऱ्यांवर सत्ता मिळाल्यानंतर कारवाई का करता आली नाही, या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे का? शिवाजी महाराजांचा कुठला इतिहास खरा? खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना अजून का सोसलं गेलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत. या निमित्तानं ती शोधण्याचा प्रयत्न झाल पाहिजे, शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास लिहीला गेला पाहिजे. तोपर्यंत आपण सगळे गांडू बगिच्यात असाच फेरफटका मारत राहू. @ravindraAmbekar Raviamb@gmail.com

Comments

tanaji khot said…
अतिशय उथळ विश्लेषण....
Unknown said…
atishay abhyas purna ani jan manacha thav gheun kelela vishleshan ..!
mindsoftware said…
विषय हाताळणी छान...

Popular posts from this blog

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्