Skip to main content

बात मुसलमान की नहीं.....

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे दु:खद निधन झालं आणि सर्व देश शोकाकुल झाला. सोशल मिडिया असो नाहीतर चावडीवरच्या गप्पा, कलाम यांच्या जाण्याने सर्वांचेच डोळे पाणावल्याचं दिसत होतं. हल्लीच्या काळात फार कमी लोकांच्या वाट्याला हे भाग्य येतं. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाची उंची नजिकच्या भविष्यात कुणी गाठू शकेल असं वाटत नाही. मनाला चटकन लावून जाणारी त्यांची एक्जीट. शेवटचा क्षण ही ते लोंकांसाठी जगले. डाॅ कलाम यांना श्रद्धांजली देणारे शेकडों मेसेजेस सोशल मिडियावर दिवसभर एकमेकांना पाठवले जात होते. त्यातलाच एक मेसेज धक्कादायक होता

देख ले ओवैसी
आज पुरा देश एक सच्चे मुसलमान के लिए रो रहा है
बात मुसलमान की नहीं देश के साथ इमान की है!

पाहायला गेला कर साधासा मेसेज, कुणीही सहज दुसऱ्याला फाॅरवर्ड करेल असा. एका सोशल मिडिया ग्रुप वर हा मेसेज आल्यानंतर माझ्या एका मुस्लीम मित्राने मला फोन केला. प्रचंड अस्वस्थ होता तो. मी त्याला अस्वस्थतेचे कारण विचारले. तो म्हणाला कलाम गेले याचं दु:ख करायला भारतीय असायला लागेल की, दु:ख जस्टीफाय करायला ते देशप्रेमी मुस्लीम होते हे सांगावं लागेल? अशा पोस्ट मागे नेमका विचार काय आहे किंवा असावा. कलाम हे एका जबरदस्त उंचीचे व्यक्तिमत्व. त्यांच्यावर त्यांचा धर्म पाहून कुणी तरी प्रेम केलंय का? कलाम यांच्या जाण्याने सर्वांनाच वेदना झाल्या मग हा ओवैसी ला इशारा का? बात मुसलमान की नहीं देश के साथ इमान की है, म्हणजे काय? सतत इमानदारीच्या परीक्षा देत बसायचे का मुसलमानांनी आता?
पोस्ट तशी छोटीशी पण गहीरा विचार करायला लावणारी. कलाम यांच्या निधनाच्या एक दिवस आधीच सलमान खानच्या ट्विट वरून वादंग माजलेलं होतं. मुसलमान शेवटी आपल्या धर्मावरच जाणार अशी काही वाक्यं त्या दिवसभरात अनेक लोकांकडून ऐकली. मुसलमान होणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न इथल्या सामान्य मुस्लीम धर्मीयांना पडणं स्वाभाविक आहे.
मुसलमानांना मी दुबळं वगैरे मी मानत नाही. व्होट बँकेच्या नावाखाली त्यांचे चोचले पुरवण्याच्या ही मी विरोधात आहे. मुस्लीम धर्मात अनेक अनिष्ट चाली रिती, प्रथापरंपरा आहेत त्यातून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. मुस्लीम समाजात शिक्षणाची आवश्यकता आहे, सुधारणांची गरज आहे. मुस्लीम आणि हिंदू समाजात धार्मिक कट्टरता जोपासणाऱ्या कथित नेत्यांना झोडून काढलं पाहिजे अशा मतांचा मी आहे. समाजसुधारणेच्या कक्षेत मुसलमानांना आणणं गरजेचं झालंय, अशा वेळी मुस्लीम समाजाला अधिक कट्टरतेकडे लोटण्यात काही हिंदू धर्मीय नेत्यांचाही स्वार्थ दिसून येतो. त्यातूनच प्रत्येक गोष्टींचा धार्मिक रंग चढताना सध्या दिसत आहे.

सलमान खान मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या जवळ गेल्याचं सर्वांनांच माहीत आहे. सलमान सहास कधी फार कट्टर धार्मीक आणि राजकीय विषयांवर बोलताना दिसला नाही. याकूब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने तो बोलला. त्याआधी याकूबच्या फाशीवरून बराच गहजब सुरूच होता. अनेक विद्वान लोकांनी यांवर मतप्रदर्शन केले होतं, याकूबला हिरो बनवण्याचं काम ही काही माध्यमांनी केलं. ते सर्वच मुस्लीम होते का? पण अपेक्षे प्रमाणे सलमानच्या ट्वीटवरून वाद निर्माण झाला आणि सलमानच्या ट्विट मागे घ्यावं लागलं. दहशतवादी ठरवल्या गेलेल्या गुन्हेगाराच्या शिक्षेवर सलमान बोलला म्हणून त्याला ट्विट मागे घ्यावं लागलं. दहशतवादाच्या विरोधात असलेला सर्व समाज सलमानच्या विरोधात एकवटला.
मला राहून राहून प्रश्न पडतो दहशतवादाच्या विरोधातला हा समाज नाशिकमध्ये न्यायालयाच्या आवारात साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहीत यांच्या वर फुलं उधळली जात असताना काय करत असतो. हा दहशतवाद विरोधी समाज फुलं उधळणाऱ्यांना बहादूर वगैरे म्हणत असतो, तो या दहशतवाद्यांना क्रांतीकारी, शूर वीर म्हणत असतो. धर्म बदलला की दहशतवादाची व्याख्या बदलणारा आपला भोंदू समाज. या समाजाला खरी सुधारणेची गरज आहे.
मुस्लीम धर्मातही असे अनेक भोंदू आहेत, जे समाजामध्ये सतत गोंधळ, अविश्वास  निर्माण करून राजकीय दुकान चालवत असतात. त्यातील अनेकजण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेही असतात. मुस्लीम समाजातील एखादा गुन्हेगार झाला की तो मुस्लीम आहे म्हणून गुन्हेगार ठरवायचा आणि मग तोच न्याय हिंदू धर्मातील गुन्हेगारांना लावला तर बोंब ठोकायची. हा दांभिकपणा आहे, अाणि तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. एकमेकांना असुरक्षित वाटणे हे अनेकांच्या फायद्याचं आहे, त्यांची दुकानं सुरू आहेत. या ना त्या मार्गाने ते संधी शोधत असतात. मग सलमान खानच्या ट्विट असो, याकूबची फाशी किंवा मग मिसाईल मॅनची अखेर!
डाॅ कलाम यांच्या अतुलनीय बुद्धीमत्ता आणि परिश्रमामुळे भारताची ती प्रगती झालीय त्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधलं गेलं पण तेवढीच त्यांची ओळख आहे का? कलाम यांनी देशाच्या संरक्षणसिद्धतेला नवीन आयाम दिला, इतकेच नव्हे तर नवीन पिढीला विचार ही दिला. ते हिंदू असते काय आणि मुस्लीम असते काय, हा प्रश्न ही त्यांच्या बाबतीत कुणाच्या मनाला कधी शिवला नसेल. मग अचानक ते मुस्लीम असल्याच्या आठवणी जागवून कुणाला तरी सतत डिवचण्याचं काम करणाऱ्या स्लीपर्स सेलचा नेमका अजेंडा काय?
सतत निवडणुकांचे आणि व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांना धर्माच्या पलिकडे ही माणूस असतो हे मान्य नाही काय? दाऊदच्या समर्थनार्थ इथे मोर्चे निघालेले कुणी पाहिलेत काय? तुमचा दाऊद तर आमचा गवळी ही काय सामाजिक देवाण-घेवाण आणि समाजकार्याचा पाया रोवणारी घोषणा होती काय? मालेगाव ला बाँब फोडणारे कुठल्या धर्माचं तत्वज्ञान सांगत होते. ओवैसीला पाठिंबा का वाढत चाललाय? औरंगाबाद महापालिका निवडणूकीच्या आधी ओवैसी वाढला पाहिजे हे कुठल्या पक्षाचे नेते सांगत होते? त्यांचा धर्म कुठला? त्यांचे इमान काय?
ऊठसूठ प्रत्येक गोष्टींली धर्माचा रंग लावायचा यांत कुणाचा फायदा आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. एका पाकिस्तानी चॅनेलवर ओवैसीने चर्चेच्या वेळी पाकिस्तानी पॅनेलिस्ट ला गप्प केलं, ओवैसी ने सांगितले भारतातल्या मुसलमानांची चिंता करू नका, ज्यावेळी भारतात राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा पासून भारतीय झालो, आमचे मुद्दे आम्ही भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत सोडवू. ओवैसींची वागण्याची आणि बोलण्याची भाषा कदाचित वेगळी असेल, पण एक गोष्ट नाकारता येणार नाही या देशाच्या राज्य घटनेत कुठल्याही धर्मीयांचं इमान इथल्या मातीशी राहील याची ताकत आहे. एकमेकांच्या इमानावर संशय घेण्याच्या मानसिकतेतून असुरक्षितता निर्माण केली जातेय, अशा शक्तिंना वेळीच ओळखलं पाहिजे आणि जागेवर ठेचले पाहिजे.

रवींद्र आंबेकर यांचा मी मराठी लाइव मधला लेख
Raviamb@gmail.com

Comments

Unknown said…
रवींद्रजी
शब्दन शब्द खरा आहे.
आजची सामाजिक , राजकीय परिस्थीती आणि सर्व पक्षीय धर्मांध नेते घेत असलेली टोकाची भूमिका त्यांचाच होत असलेला फायदा यांच परखड विश्लेषण
एकविसाव शतक साद घालत असताना जुन्या रूढी परंपरा यांचा मान / आब राखून देशाला पुढे नेणे ही तर प्रार्थमीकता प्रत्येक नागरिकात रुजवायला हवी
राजकीय नेते ज्याचं सर्वसामान्य जनता ऐकते त्यांनी हे बिंबवायला हव पण घोड तिथेच तर पेंड खात.

निलेश आंबेकर - ठाणे
९८२००३२७७२
Unknown said…
very nice article raviji. very balance

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्