Skip to main content

ऐसे कैसे जाले भोंदू

  कुंभमेळ्यासाठी कमी काळात जर या देशातील प्रशासन एखाद्या शहराचा चेहरा बदलण्याची ताकद ठेवत असेल तर मग ज्या शहरांचं, गावांचं आरोग्य बिघडलंय तेही दुरुस्त करण्याची ताकद इथल्या प्रशासनात आहे, हे नाकारून चालणार नाही.    सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झालीय, जवळपास तीन महिने हा दिव्य सोहळा नाशिकमध्ये चालणार आहे. गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये जाऊन आलो, प्रशासनाने केलेली भव्य दिव्य तयारी पाहिली. नाशिकच्या कुंभमेळ्यावर होत असलेला खर्च आणि आयोजन पाहिल्यानंतर या देशाला कधीच मंदी स्पर्श करू शकणार नाही असं वाटतं. प्रचंड पैसा खर्च करून नाशिकचे रस्ते चकाचक करण्यात आलेयत. साफसफाई करण्यात आलीय, झाडांची कटाई करण्यात आलीय. सर्व काही मस्त दिसत होतं.  कुंभमेळ्याच्या निमित्तानं लाखो लोक नाशिकमध्ये येणार, राहणार म्हणून विशेष तयारीसाठी गेले काही महिने प्रशासन दिवसरात्र काम करतंय. कुंभमेळ्यासाठी विशेष मंत्री पण नेमण्यात आलेला असल्याने समन्वयाची चिंताच नाही. बैठक घेऊन लगेचच निर्णय घेतले जातात आणि त्याची अमलबजावणीही लगेच होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही बरीच काळजी घेण्यात आलीय. दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. ड्रोन उडवायलाही बंदी घातलीय. सर्व व्यवस्था एकदम मस्त.  
 कुंभमेळ्याचं सामान्य माणसाला वेगळंच आकर्षण. लहानपणापासून पाहत आलोयत की बॉलिवुडमधल्या अनेक स्क्रीप्ट कुंभ के मेले में बिछडे हुए भावा-बहिणींवर आधारित आहेत. मधल्या काळातील चेंगराचेंगरीमुळे प्रशासन अजून सतर्क झालंय. कोणी गर्दीत हरवू नये म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आलीय. महिलांची सुरक्षितता ही महत्त्वाची म्हणून सीसीटीव्हीवरून सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून पाण्याचं शुद्धीकरण, पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आलीय. देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची काळजी घेतली जातेय. बाबा-साधूमहाराजांची मर्जी सांभाळण्याचंही काम जोरदारपणे सुरू आहे. त्यांचा गांजा सुरक्षित कसा राहील यावर तर आता पोलिसांचंच लक्ष आहे. कॉन्डोमची वाढती मागणी पूर्ण कशी करायची या चिंतेने सरकार, मेडिकल स्टोअर्सवाले परेशान आहेत तर मागणी पूर्ण होईल की नाही या चिंतेने पत्रकारांचीही झोप उडालीय.  

 दरम्यानच्या काळात टेक्निकल बलात्कार म्हणून माध्यमांना ब्रिफींग करून स्वत:ची मान सोडवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या जालनातल्या पोलिसांनी एका बलात्कार पीडित तरुणीला ट्रॅपसाठी वापरून पुन्हा गुन्हेगारांच्या हाती सोपवलं. त्या पीडित तरुणीवर पोलिसांच्या सुरक्षेत असताना बलात्कार झाला. जळगावच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आपल्या ज्युनिअर अधिकाऱ्यांकडून सोन्याचे कॉइन्स घेतल्याची बातमीपण आऊट झाली. पाणी नसल्याने आणि पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या, दुबार पेरणीचं मोठं संकट ओढवलंय. गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, लोक लांब पल्ल्याच्या ट्रेनमधल्या टॉयलेटमधलं पाणी पिण्यासाठी वापरताहेत. खोल विहिरींतून पाणी भरताना काही बायका पडून मेल्याच्याही बातम्या छापून आल्यायत. मुंबईमध्ये गर्दीत दररोज शेकडो लोक हरवतात, रेल्वेखाली दरवर्षी हजारो लोक कापले जातात. रस्तोरस्ती महिलांची छेड काढणारे असंख्य टपोरी वाढताहेत. रस्त्यांचं म्हणाल तर प्रमुख शहरांमधल्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालीय. पदपथांवर अतिक्रमणं, घाण- कचरा...   
 आरोग्याचं म्हणाल तर, तरुणांमध्ये ड्रग्जचं प्रमाण वाढतंय. ‘म्याव म्याव’ नावाच्या ड्रगच्या आहारी तरुण मुलं चाललीयत. शाळा कॉलेजच्या बाहेर हे ड्रग सर्रास मिळतायत. थोडक्यात, सर्वच शहरांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतायत. पोटापाण्यासाठी राहतायत. मिळेल तिथे खातायत. जीवावर बेतणारा प्रवास करतायत. महिलांवरच्या अत्याचारांची संख्या वाढतेय. हुंडाबळीच्या प्रकारांनी पुन्हा उचल खाल्लीय. पोलिस वैफल्यग्रस्त झालेत. गेली अनेक वर्षे जगण्यासाठी सुरू असलेला कुंभमेळा संपतच नाहीये. या कुंभमेळ्यात कित्येक लोकं हरवली ती पुन्हा सापडलीच नाहीत. त्यांची माहितीही कधी बाहेर येत नाही. गांजा ओढल्यासारख्या सर्व व्यवस्था आणि यंत्रणा या सर्वांकडे नशिल्या डोळ्यांनी पाहतायत. त्यांच्या मेंदूमध्ये मात्र काहीच रेकॉर्ड होत नाहीये.      कुंभमेळ्याच्या निमित्ताने होत असलेला खर्च खरोखरच आवश्यक आहे का? असा प्रश्न मला या निमित्ताने पडलाय. देशभरातील कोण कुठले बोगस साधू - बाबा या निमित्ताने संधी साधण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. गांजाचा धूर काढत विक्षिप्त चाळे करणाऱ्या बाबांना कुठल्या धर्माचा आदेश आहे असं वागण्यासाठी? धार्मिक श्रद्धा म्हणून अनेक जण कुंभमेळ्यात जातात. या लोकांचं प्रबोधन करण्याची गरज आलीय असं वाटत नाही का आता? देशातील अनेक जाती-जमाती हे पूर्ण वर्षभर अशाच काही ना काही धार्मिक समारंभांमध्ये अडकलेल्या असतात. सतत कुठे ना कुठे यात्रा-जत्रा-जुलूस...  
 अंधश्रद्धा निर्मूलनासाठी या राज्यात कायदा आणला गेला. त्याची अमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी अनेक अंधश्रद्धा जोपासणारा कुंभमेळाही या राज्यात जोरात साजरा केला जातो. काही काळासाठी म्हणजेच हंगामी वास्तव्य करण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी हजारों कोटी रुपये खर्च करून व्यवस्था केली जाते. पोटाचा कुंभ भरण्यासाठी शहरांमध्ये येणाऱ्या लाखों लोकांचं काय? आकाशाकडे डोळे लावून पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी आता कुठल्या कुंडात डुबकी मारावी? तुमचा कुठला सीसीटीव्ही जालनातल्या त्या तरुणीला बलात्कारापासून रोखणार आहे?      या देशासमोर अनेक मूलभूत प्रश्न आ वासून उभे आहेत यात शंका नाही. काँग्रेसने सत्तेच्या काळात या देशातले मुख्य प्रश्नच हरवून जातील असे अनेक कुंभमेळे तयार केले आहेत. भाजप सरकारही त्या ट्रॅपमध्ये फसलंय. कुंभमेळ्यासाठी कमी काळात जर या देशातील प्रशासन एखाद्या शहराचा चेहरा बदलण्याची ताकद ठेवत असेल तर मग ज्या शहरांचं, गावांचं आरोग्य बिघडलंय तेही दुरुस्त करण्याची ताकद इथल्या प्रशासनात आहे, हे नाकारून चालणार नाही.   
 कुंभमेळ्यांच्या आयोजनात पुढे पुढे करून पक्षाचा झेंडा वर न्यायचा प्रयत्न करताना भारतीय जनता पक्षाने आता अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. अंतराळयुगात महत्त्वाचा टप्पा गाठत असतानाच अजूनही मानसिक रोगी असलेल्या बाबांच्या सन्मानासाठी किती पायघड्या अंथरायच्या? एकीकडे कुंभ सुरू असतानाच पंढरपूरची वारीसुद्धा सुरू आहे.   वारीमध्ये धर्माचा ओंगळवाणा चेहरा दिसत नाही. भोंदू बाबांवर प्रहार करणाऱ्या संतांची मोठी परंपरा खांद्यावर घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गटांमध्ये दर्शनावरून कधी तलवारी उपसल्या गेल्या नाहीत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने तीन महिने कर्मकांडाचा जो बाजार मांडला जाणार आहे त्यावर आता हळूहळू अंकुश आणला पाहिजे. ज्यांना अजूनही हा विचार पटायला जड जात असेल त्यांनी आपल्याच समृद्ध संत परंपरेतून थोडा बोध घ्यायला हरकत नाही.
  
 ऐसे कैसे जाले भोंदू ।  कर्म करोनि म्हणति साधु
 अंगा लावूनियां राख ।  डोळे झांकुनी करिती पाप
 दावुनि वैराग्याची कळा ।  भोगी विषयाचा सोहळा
 तुका म्हणे सांगों किती ।  जळो तयांची संगती   

 - See more at: http://mimarathi.in/kumbhmela-ground-report#sthash.V9SNyz0W.dpuf

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्