Skip to main content

मोदी, गांधी आणि मार्केट.....

राहुल गांधी भारतात परत आले. नरेंद्र मोदी ही नुकतेच परदेश दौरा संपवून भारतात आले. दोघांच्याही परदेशवारीच्या मुद्द्यावरून प्रचंड वाद सुरू आहे. राहुल गांधींनी परत येताच काही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि रामलीला मैदानावर एक प्रचंड मोठी महाकिसान रॅली काढली. महाकिसान रॅलीतून राहुल गांधी देशातील शेतकऱ्यांना संघर्षाचा काही मंत्र देतील असं वाटलं होतं पण शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेसने कसं चांगलं काम केलं हे सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या लढ्यात काँग्रेस नेहमीच पुढे असेल असं भाषण केलं. राहुल गांधी एवढ्या दिवसांनंतर आलेयत म्हटल्यावर ते देशभरातील मरगळलेल्या काँग्रेसजनांमध्ये नवीन जान फुंकतील आणि काँग्रेसला नवा कार्यक्रम देतील अशा आशेवर बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना जुनंच भाषण नवीन आवेगात ऐकून परतावं लागलं. नाही म्हणायला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भाषण जरूर केलं, पण अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताना आणलेला हा आवेश सारखं सारखं बुंद से गई वो हौद से नहीं आती या म्हणीची आठवण करून देत होता. पहिल्या टप्प्यात गैरहजर राहणाऱ्या राहुल गांधींना आपण मैदानात फार उशीरा उतरतोय याची जाणीव काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी करून द्यायला हवी होती. असो, आता हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला म्हणून आपण यावर बोलणं टाळूया. 
राहुल गांधी फेलच आहेत अशी एव्हाना काँग्रेसच्या नेत्यांचीही भावना होत चालली असावी, किंवा ती तशी झाली असेल तरी काही वावगं नाहीय. राहुल च्या अपयशाच्या पाढ्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं विश्लेषण. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊनच ही भली मोठी भाषणं केली होती. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले पाहिजेत यासाठी सत्तेत आल्यावर आपण लगेच निर्णय घेऊ असंही मोदींनी सोलापूरच्या एका सभेत सांगीतलं होतं. शेतकऱ्यांच्या मालाला मार्केट आणि हमी भाव देण्याच्या 200 डेसीबल आवाजातल्या भाषणांनी शेतकऱ्यांचा कान भरून गेला होता. आता हळूहळू कानातलं वारं कमी झालंय आणि शेतकऱ्यांना त्यांच्या अच्छे दिनाच्या बातम्याच ऐकू येईनाशा झाल्यायत. मोदी सरकार आल्यानंतर दुष्काळ पडणार हे स्पष्टच झालं होतं. त्यात अवकाळीनेही बरंच नुकसान केलं. महाराष्ट्रालाही बराच फटका बसला. या दुष्काळाची फाईल कुठल्यातरी खालच्या टेबलावर काही महिने पडून होती अशी कबुली राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. तरी राज्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या मनाने नव्या सरकारला वेळ दिला. दुष्काळाच्या निकषांची दिल्लीत चर्चा सुरू राहीली तोवर अवकाळी – गारपीट यांचा मारा सुरू झाला. एका मागोमाग एक संकट शेतकऱ्यांवर कोसळू लागलं.
शेतकऱ्यांच्या अपेष्टा वाढू लागल्या. राज्यात एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी आणि महसूल या खात्यांचा भार आहे. खडसे एकीकडे मिडीयाला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोललोय असं दरडावून सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या इन्फ्रास्ट्रक्चरप्रोजेक्टच्या मार्गातील अडथळे दूर करत होते. केंद्रीय कृषी खात्याचं पथक सारखे सारखे प्रस्ताव नाही तर एकच प्रस्ताव पाठवा सांगत होतं. नरेंद्र मोदी परदेशात येऊन जाऊन होते. मध्यंतरी ते बारामतीलाही गेले आणि शरद पवारांकडून कसं शेतीविषयक मार्गदर्शन घेत होते याचं सुंदर विवेचनही त्यांनी केलं. हेच नरेंद्र मोदी प्रचाराच्या काळात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शरद पवारांना दोषी मानत होते. काळ बदलल्यानंतर भूमिका बदलू शकतात, ती संधी आपण मोदी यांना दिली पाहिजे.
राज्यातील दुष्काळातील स्थिती वर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार काम करेल असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी काही योजनांना सुरूवात करत असल्याचं ही जाहीर केलं. या काळात निसर्गाचं चक्र काही थांबलं नव्हतं. अवकाळी आणि गारपीट सुरूच होती. पिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत ही मिळाली असं सरकार जाहीर करत राहीलं. अनेक शेतकरी मात्र मदत न मिळाल्याची ओरड करत राहिले. शेवटी अकाऊंट नसल्याने काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असं स्पष्ट करण्यात आलं. याच काळात एका आमदाराच्या पीए कडे मदतीचे काही चेक सापडले. मदतीचे चेक वाटण्याऐवजी वठवण्याचा प्रयत्न असावा. अच्छे दिनाच्या या फेऱ्यात शेतकरी मात्र नाडला गेला.
हा सगळा इतिहास सांगायचं कारण म्हणजे आता राजे-युवराज आणि छोटे – मोठे सरदार सगळे जण भारतात आहेत. मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांचे काही नेते मोदींच्या कँप मध्ये गेल्याने त्यांच्या लढ्याची धार बोथट झालीय, पण ते ही कुठल्याही क्षणी मैदानात उतरू शकतात. अण्णांनाही पुन्हा झळाळी मिळालीय, त्यामुळे बळीराजाच्या समस्यांवर झाली तर आत्ताच चर्चा होऊ शकते. एवढं सगळं असून ही शेतकऱ्यांच्या विषयीची चर्चा ही पुन्हा एकदा खोटे आकडेवारी आणि रिपोर्ट यांच्या मध्ये येऊन फसलीय.
अवकाळीनंतर केवळ तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहीती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत दिलीय. हे सरकारही काही नवीन नाही याची प्रचिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिलीय. ज्यांनी चिठ्ठ्या लिहून आत्महत्या केली अशाच शेतकऱ्यांची आत्महत्या ग्राह्य धरली गेलीय असा खुलासा राज्य सरकारने केलाय. गेल्या तीन महिन्यांत सहाशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असताना केवळ चिठ्ठी लिहायचं राहून गेल्यामुळे अनेकांच्या आत्महत्या या अवकाळी मुळे झालेल्या आत्महत्या मानल्या जाणार नाहीयत. शिवसेनेने ही या आकडेवारीच्या गडबडीवर आक्षेप घेतलाय.
गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात दुष्काळ- अवकाळीचं सावट आहेच. अशा स्थितीत नेमकं काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. अशातच भूसंपादन कायद्याचं भूत पुन्हा मानगुटीवर बसलंय. म्हणजे युपीएच्या काळात ते नव्हतं अशातला भाग नाही, पण युपीएच्या काळातल्या ज्या मुद्द्यांवर भाजपनेही सहमती दाखवली होती त्यातल्याच काही मुद्द्यांबाबत मोदी सरकारने घेतलेली भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. शेतकऱ्यांच्या सहमतीचा, पाच वर्षांच्या मुदतीचा मुद्दा मोदी सरकारने वगळल्याने वाद सुरू आहे.  
शेती आणि शेतकरी हा नेहमीच भाषण आणि इमोशन चा मुद्दा राहिलाय. बांदावरच्या शेतकऱ्यांची दु:खं समजणाऱ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना सत्तेची ऊब लागल्यावर शेतीला प्रतिष्ठा, शेतमालाला भाव, शेतकऱ्यांना विमा वगैरे शब्द आठवेनासे होतात. शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची मागणीही मध्ये मध्ये होत राहते, पण शेवटी कदाचित मार्केट आडवं येत असावं. आज भारतातला शेतकरी जमीन-बियाणं या सर्वच क्षेत्रात मार्केटच्याआव्हानांना तोंड देतोय. या मार्केटमध्ये राजे-राजकुमार-सरदार आणि कॉर्पोरेट ठेकेदार या अनेकांचे हितसंबंध गुंतलेयत. मार्केटच्या बॅलन्सशीटच्या चोपड्यांमधून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या चिठ्ठ्या वाचायला वेळ आहे कुणाला.

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्