मंदिर प्रवेशासाठीचं आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यात प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष सहभाग मला घेता आला, तशी संधी मला मिळाली. मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशाच्या आंदोलनातील एक महत्वाचा मुद्दा विसरला जातोय, तो म्हणजे हे केवळ मंदिर प्रवेशाचे आंदोलन नाही, तर हे समानतेसाठीचं आंदोलन आहे. महिलांना समान अधिकार, वागणूक मिळावी म्हणून हे आंदोलन आहे. यात मंदिर प्रवेश हा एक सविनय कायदेभंग सारखंच हत्यार आहे. त्याला हवं तर सविनय रूढी- परंपरा भंग म्हणू. याचाच अर्थ आम्हाला कायदे नकोत असा नाही, आम्हाला कालबाह्य कायदे, रूढी परंपरा नकोत. असमानता शिकवणाऱ्या परंपरा तर अजिबात नकोत. मंदिरातला देव जर महिला, दलित यांच्या सहवासात बाटत असेल तर तो देव टाकला पाहिजे असं माझं मत आहे.
तृप्ती देसाईंच्या आंदोलनाचं हसं करण्याचा प्रयत्न आजूबाजूला होत असल्याचं दिसतंय. यात गैर आणि चुकीचं काहीच नाही असं मानणारा मोठा वर्ग आहे. त्या वर्गाचं बौद्धीक घ्यावं असं मला वाटत नाही. त्यांना त्यांची चूक पुढे लक्षात येईल. या आंदोलनाला विनोदाचा, वैयक्तिक टीकेचा, आरोप- प्रत्यारोपाचा विषय करणारे हे त्यांच्या वंशपरंपरेला साजेसे वागत आहेत. आज ते दगड- गोटे, चिखल हातात घेऊन फेकू शकत नाहीयत, म्हणून ते असा प्रयत्न करणार यात नवल वाटावं असं काही नाही. त्यांच्या विचारांच्या पूर्वजांनी हेच केलं. पण वेळोवेळी त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे अशा विनोदविरांकडे जोकर म्हणूनच पाहिलं पाहिजे.
मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाची सुरूवात कुठून झाली याचा इतिहास मोठा आहे. अनेकांनी त्या त्या काळात मंदिर प्रवेश करून आपला लढा लढलाय. मी फार उदाहरणं देऊ इच्छित नाही, पण ज्ञात इतिहासात ज्यांनी ज्यांनी हे लढे लढले त्यांनी त्या मंदिर प्रवेशानंतर देवाला, देव संकल्पनेला तिलांजली देऊन चळवळी उभारल्या आणि ज्या कारणांमुळे प्रवेश नाकारणे, समान अधिकार न देणे अशी कृत्य समाजाकडून होतात ती कारणे समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या कारणावर आघात केला. महिलांना मंदिर प्रवेश नाही याची काही कारणे धार्मीक असल्याचं सांगीतलं जातं. अशा धर्माच्या चिकित्सेचा अधिकार तृप्ती देसाईंसोबतच या देशांतील प्रत्येक महिलेला आहे. राज्यघटनेने महिलांना समान अधिकार दिलेयत. त्या अधिकारांच्या आड येणाऱ्यांवर तर कायदेशीर कारवाई ही करता येणे शक्य आहे. पण आपली शासनकर्ती जमात ही भीत्री आहे. ती लोकानुनय करते. त्यात नेतृत्व नाही. त्याचमुळे मंदिर प्रवेशासारख्या क्षुल्लक गोष्टीवरून संघर्षाचं वातावरण निर्माण होताना दिसतंय.
पुण्यातल्या एका महिलेने शनी शिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन शनीचं दर्शन घेतलं. त्यावेळी मी वृत्तवाहिनीचा संपादक या नात्यांचे पुण्यातल्या 'त्या' महिलेचं जाहीर अभिनंदन केलं, एवढंच नव्हे तर तिच्या लढ्याला समर्थनही दिले. मध्ये जवळपास आठवडाभर या मुद्द्यावरून गोंधळ सुरू राहिला. मंदिरप्रवेशाच्या मुद्द्यांवर मी ठाम भूमिका घेतली होती. त्यावेळी अनेकांनी मला प्रश्न विचारला होता की तू स्वत: नास्तिक असताना अशी भूमिका का घेतली. त्या ही वेळेस माझं हेच सांगणे होते की मुद्दा मंदिर प्रवेशाचा नाहीय , समान अधिकाराचा आहे. भेदभाव संपवण्याचा आहे. त्या ही वेळेस पुण्यातील 'ती' महिला चुकून चौथऱ्यावर गेली होती आणि नंतर तीने माफी मागितली अशा अफवा पसरवल्या गेल्या. मंदिर ट्रस्ट ने ही तसं सांगायला सुरूवात केली. मी अस्वस्थ झालो होतो. ती महिला कोण हे शोधा म्हणून सर्व वार्ताहरांना सांगीतलं, पण कुठून माहिती मिळेना. शेवटी सोशल मिडीया कामी आलं. रवींद्र तहकीक नावाच्या एका अवलिया पत्रकाराने त्याच्या बातमीपत्रात एक चौकट प्रसिद्ध केली. त्यात त्या महिलेचं छोटंसं स्टेटमेंट होतं. रवींद्र तहकीक ने शनिशिंगणापूचा कालाचिठ्ठा चं प्रसिद्ध केला होता. मी रवींद्र तहकीक शी बोललो. योगेश बोरसे यांनी सुद्धा संपर्क साधला. शेवटी त्या महिलेशी बोलून कळवतो म्हणून तहकीक नी शब्द दिला. पुण्यातल्या त्या महिलेचा नंबर मिळाला. मी त्या महिलेशी बोललो आणि त्यावर टीव्ही शो सुद्धा केला. त्या महिलेने स्पष्ट सांगीतलं की तिने काही हे चुकून केलं नव्हतं , माफी तर बिल्कुल मागितली नव्हती. शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश करणे हा तिच्या मिशनचा भाग होता. जर मुख्यमंत्री जाहीरपणे मंदिर प्रवेशाबाबत भूमिका घेणार असतील, आणि सुरक्षेची हमी देणार असतील तर आपण स्वत:हून पुढे येऊ, पण मला जे करायचं होतं ते फक्त बोलत बसण्यापेक्षा मी करून दाखवलं, असं तिचं म्हणणं होतं.
त्यानंतरच्या एका चर्चेत शनी शिंगणापूर न्यासात महिलांना त्यात प्रतिनिधीत्व का नाही असा प्रश्न तिथल्या विश्वस्तांना विचारला तेव्हा ते गोंधळले. असा काही कायदा नाही वगैरे सांगायला लागले. मात्र नंतर बहुदा त्याच्या लक्षात ही चूक आली असावी आणि त्यांनी महिला अध्यक्षांच्याच हाती कारभार देऊन टाकला. खरी चिंतेची बाब इथून सुरू होते. महिला अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच बंदी कायम राहील असं जाहीर केलं.
मंदिर प्रवेशाचा हा लढा नेमका कुणासाठी, कुठल्या महिलांसाठी आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. महिलांनीच विरोध केल्यामुळे आता एकंदरीतच पुरूष मंडळींचं फावलं होतं. महिलांचीच ढाल केल्यामुळे हे आंदोलन संपेल असं वाटलं होतं. पण विद्या बाळ यांनी कायदेशीर आणि तृप्ती देसाई यांनी रस्त्यावरची लढाई जिंकून दाखवली.
महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या आंदोलनाला आता वेगळं वगळण मिळेल ते पुढे जाईल असं वाटलं होतं, पण खेदानं नमूद करावंसं वाटतं तसं झालं नाही. त्यानंतर तृप्ती देसाई ट्रॅप मध्ये फसत गेल्या. त्रंबक बद्दल का बोलत नाही, हाजीअलीबद्दल का बोलत नाही... उद्या एखाद्या दर्गा- मजार पासून सगळीकडे प्रवेशासाठी लढत बसणार का. मंदिर प्रवेशाचं हे आंदोलन रोजचं काम आणि उपचार बनू नये.
महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचं ते एक हत्यार बनावं.
रोजच्या मंदिरप्रवेशांमुळे यापुढे तृप्ती देसाईंना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. या सर्व मंदिरंच्या ज्या सर्व पूजा अर्चा, यात्रा होतात त्यांना पण तुम्ही जाणार का? देवधर्म तुम्हाला मान्य आहे का, प्रवेश केल्यावर तो हक्क मान्य झाल्यावर तुम्ही त्या त्या मंदिराच्या प्रथा- परंपरेप्रमाणे पुजा करणार का? यात सर्वांत मोठा धोका निर्माण होतोय त्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे, महिलांसाठी पुजा- अर्चा, उपास- तपास करण्यासाठी अजून एक देव- मंदिर खुलं झालं.
ज्या वर्तुळातून महिलांना बाहेर काढण्यासाठी अनेक सामाजिक लढे झाले, चळवळी उभारल्या गेल्या त्या चळवळीचं नुकसान होणार नाही याकडे सुद्धा तृप्तीताई तुम्ही पाहिलं पाहिजे. तुम्ही आक्रमक आहात, विषय मांडू शकता, लढू शकता.. पण अशा लढायांना मिडीयाचं जे ग्लॅमर येतं च्या ग्लॅमर पासून दूर राहून काम करता यायला हवं. मूलभूत काम आणि संघटन पण उभं राहायला हवं. मोर्चाचा दहा माणसं आणि १०० मिडियावाले या गर्दीत कधी कधी मुद्दे हरवतात आणि हे ग्लॅमर हटले की सर्व एकदम सुनंसुनं वाटतं. तुम्ही या ' फेज' मध्ये अडकू नका.
मंदिर कशाला दर्ग्यात जा, मशिदीत जा, गुरूद्वारात जा, अमुक तमुक चर्च मध्ये जा असे सल्ले आणि आव्हाने रोज मिळतील. त्यातल्या ट्रॅप पासून मुक्त व्हा. महाराष्ट्रातील काही भागात केवळ पाणी आणण्यासाठी बहुपत्नी परंपरा निर्माण झालीय. एक महिला घर- मुलं सांभाळते, दुसरी फक्त पाणी भरण्याचं काम करते. जत भागातील कित्येक मुली - महिला दिवसभर फक्त पाणी आणायचं काम करतात. ही थोडी-थोडकी उदाहरणं आहेत. आणखीही बरेच मुद्दे आहेत. आता या मुलींचा शाळा- कॉलेज प्रवेश करण्यासाठी काम सुरू करा. मंदिर प्रवेशाचं हे आंदोलन आता थांबवलं पाहिजे. एखादं काम सुरू करताना थांबायचं कुठे हे ही समजलं पाहिजे.
रवींद्र आंबेकर
raviamb@gmail.com
@RavindraAmbekar
Comments
चुकून फ़ोन येईल तुम्हाला आणि शिव्या खाल ऱाव
आम्ही भी असाच सल्ला दिला होता