माइलस्टोन..
निवडणूका
म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र
मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी
अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास
होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली.
महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला.
पैकी
बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत: पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं
महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा
प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात
टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट
झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा
डब्बा गुल झाला.
मतमोजणीला
सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर
प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्या तासात पोस्टल बॅलट ची गणना सुरू होती त्यावेळी
जणू हेच काही खरे ट्रेंड आहेत अशा पद्धतीने टीव्ही वाहिन्यांनी मोदींना
जिंकवण्यासाठी सुरूवात केली होती. जवळपास सर्वच वाहिन्यांचे आकडे एकमेकांच्या
विरूद्ध होते. राष्ट्रीय वाहिन्यांची तर गोचीच झालेली दिसली. एक्झिट पोल मध्ये ही
वाहिन्या आणि मोठी वृत्तपत्रे तोंडावर आपटली होती. हे नेमकं का झालं, कसं झालं
याचं साधारण विश्लेषण करायचं झालं तर एक लक्षात येतं की जेव्हा माध्यमं आपली
निष्पक्ष भूमिका विसरतात तेव्हा असं काही होतं. एका राष्ट्रीय चॅनेलच्या
मालक-संपादकाने एक्झिट पोल मध्ये जेव्हा महाआघाडी जिंकणार असं चित्र दिसायला लागलं
तेव्हा त्याचं असं विश्लेषण केलं की जरी हे आकडे येत असले तरी महाआघाडी आणि भाजप
आघाडीच्या मतांमध्ये केवळ 1 टक्के मतांचा फरक आहे आणि तो फार नाही. त्यामुळे भाजप
आघाडी सुद्धा जिंकू शकते. बाकीच्या सर्वे वाल्यांची फार गोची झाली होती आणि
त्यामुळे त्यांनी भाजप आघाडीला जिंकवणारी सर्वेक्षणं दाखवली.
मतदारांचं
काम त्या आदीच संपलं होतं त्यामुळे या सर्वेक्षणांचा प्रभाव त्यांच्या मनावर पडणार
नव्हता. मग तरी सुद्धा कुणाल खुष करण्यासाठी अशा पद्धतीने सर्वेक्षणांचे अंदाज
पुढे आले कुणास ठाऊक. एक वेळ वादासाठी मान्य केलं की सर्वे अतिशय शास्त्रीय
पद्धतीने केले होते मग चुकलं कुठे हे ही शोधलं पाहिजे. लोकांच्या मनात काय आहे हे
शोधणं तसं कठिणच. अनेक वर्षे राजकारणात राहूनही राजकीय पक्षांनाही हे समजत नाही.
त्यामुळे सर्वेचे अंदाज चुकले किंवा चुकणार हे मान्य केलं तरी माध्यमांची भूमिका ही
संशयास्पद आहेच. ठराविक एक पक्ष जिंकावा म्हणून विश्लेषकांनी मतदान झाल्यानंतरही
किती प्रयत्न करावेत याला काही सीमा आहे की नाही.
प्रत्यक्ष
मतमोजणीच्या दिवशी ज्यावेळी ट्रेंडस यायला सुरूवात झाली त्यावेळी महाआघाडीचे आकडे
वाढत असताना काही टीव्ही वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या इ-एडीशन्स मात्र ते आकडे
दाखवायला तयार नव्हते. एवढंच काय लोकसभा आणि राज्यसभा टीव्ही ही वेगवेगळे आकडे
दाखवत होते. पोपट मेलाय हे सांगायला कुणी तयार नव्हतं अखेरीस एका इंग्रजी
वृत्तपत्राने ही कोंडी फोडली आणि मग काही राष्ट्रीय वाहिन्यांनी या वृत्तपत्राच्या
सौजन्याने – या वृत्तपत्राचा दावा असं म्हणत नितीश आणि लालू यांना बढत दाखवायला
सुरूवात केली.
याच
वेळी माध्यमांच्या या गडबड-गोंधळावर सोशल मिडीयावर मात्र प्रचंड टीका सुरू झाली.
कोंबडं झाकलं तरी उगवायचं काही थांबत नाही. अखेरीस महाआघाडी सपशेल बहुमताच्या पार
गेल्यानंतर कुठे टीव्ही वाहिन्यांचा आकडा हलला. 50-56 आणि 63 पर्यत महाआघाडीला
थांबवून ठेवलेल्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी अचानक महाआघाडीला 150 जागांवर बढत
दाखवायला सुरूवात केली.
माध्यमांमधील
हा गोंधळ भोळेभाबडेपणाने झाला असं मानायचं काही कारण नाही. एक वेळ तसं मानलं तरी
माध्यमांच्या एकूणच विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह लागू शकते. पोपट मेलाय हे
सांगायला कुणाची भीती आहे का? नाही दिलं मतदारांनी एखाद्या पक्षाला मत, म्हणून
त्यात दडवण्यासारखं काय आहे. हा पराभव कुणाचा याची कारण मिमांसा करणं ही काही
लोकांनी टाळलं. हे प्रगल्भतेचं लक्षण नव्हे. असं होत राहिलं तर एक दिवस लोक
माध्यमांची मक्तेदारीही उलथवून टाकतील.
लालू
आणि नितीश कुमार यांचं राज्य आल्यानं बिहारचा कायापालट होणार आहे अशातला भाग नाही,
असं असतानाही देशातल्या ( मोदी ) विरोधी पक्षांना या निकालांमुळे नवीन संजीवनी
मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्तेत आल्यानंतर मोदी समर्थकांची छाती
56 इंचाच्या पुढे जात होती. तिला बिहारच्या जनतेने टाचणी टोचल्यामुळे शिवसेनेसारखा
‘मित्र’पक्ष ही प्रचंड सुखावलाय. शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे
की पराभवाला सुद्धा मोदींनी जबाबदार असायला हवं. हाच स्वर आता भारतीय जनता
पक्षातील नाराज नेत्यांकडूनही ऐकायला मिळेल. एकंदरीतच मोदींच्या साम्राज्याला
आव्हान देणारी ही निवडणूक असल्याने गुजरातची गादी सांभाळायला अमीत शहा यांची
रवानगी करून पक्षाला येत्या काळात नवीन नेतृत्व ही मिळू शकेल अशी चिन्ह आता दिसू
लागलीयत. नरेंद्र मोदींनी विश्वरूप धारण करून जगभरात संघविचारधारेचा प्रचार प्रसार
करावा असं संघाला वाटतंय. त्यामुळे देशात सत्ता आल्यानंतर आता जगामध्ये आपला विचार
पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदी संघाला हवे आहेत. एका निवडणूकीतील पराभवामुळे त्यांचे
मार्क कमी होणार नाहीत मात्र यामुळे अमीत शहा यांच्या पोल मॅनेजमेंट वर मात्र
प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मोदी
सबका साथ सबका विकास ची भाषा बोलत असताना त्यांचे भगवे वेशधारी चिल्ले-पिल्ले
विनाशाची भाषा बोलत होते. जातीय-धार्मीक सलोखा बिघडवणारी भाषा बोलत होते. भाजप
विरोधकांना पाकिस्तानी ठरवत होते. एकूणच उन्मादाचं दर्शन घडवत होते. हा देश
मतपेटीच्या जोरावर जिंकल्यानंतर बळाची भाषा बोलू लागले होते. त्यांच्या तोंडाला
चिकटपट्टी लावायची सोडून प्रश्न विचारणाऱ्यांना कधी पाकिस्तान-कधी अमेरिकेचं एजंट
बनवण्याचा प्रकार सुरू झाला. असतील कुणी असे एजंट त्यांना जेल मध्ये टाका पण या
भगव्या पिलावळींना आवरा असा संदेश बिहारच्या जनतेनं मतदानातून दिला आहे. मोदींनी
ज्या पद्धतीची आक्रमक भाषणं केली त्यातून त्यांचा आवेश दिसतो पण त्यांचे
कार्यकर्ते त्यांच्या भाषणातील आवेश- आक्रमकपणा घेण्याएवजी आक्रस्ताळेपणा आणि
उन्माद घेतात आणि तो खाली झिरपताना अधिक ओंगळवाणा होत जातो याकडे जोपर्यंत मोदींचं
लक्ष जाईल तो पर्यंत त्यांच्या हातातून दिल्लीचं तख्त गेलेलं असेल.
बिहारची
निवडणूक हे मोदींच्या कामाचं सर्टीफिकेट नाही. मोदींनी केलेल्या कामाचं सर्टीफिकेट
त्यांना लोकसभा निवडणूकीतच मिळेल. दिल्ली किंवा बिहार निवडणूका या मोदींना
मिळालेला इशारा आहे. या देशात मोदी सोडून इतर पक्षांमध्ये पण स्वत:ची ताकत असलेले नेते आहेत. एवढंच काय
भारतीय जनता पक्षात सुद्धा अनेक दिग्गज आणि ताकतवर नेते आहेत. मोदींना जो स्वत:च्या स्वप्नातील भारत घडवायचाय तो
घडवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जावं लागेल. जात-धर्म, गाय हे मुद्दे उचलून देशाचा नेता बनता येणार नाही, आवाज दडपून हुकूमशहा ही बनता येणार नाही. शत प्रतिशत
चा नारा काही चुकीचा नाही, पण त्यासाठी इतरांना संपवणं हा काही अजेंडा होऊ शकत
नाही. मोदी समर्थकांच्या भूमिकांमधून हा दर्प दिसून येतो.
बरं, बिहार मध्ये लालू-नितीश यांच्या जोडीनं जे केलं ( काँग्रेसच्या साथीनं ) ते इतर राज्यांमध्ये- निवडणूकांमध्ये घडू शकेलच असं नाही. मोदी समर्थकांचा जो उन्माद आज दिसतोय काहीसा तसाच उन्माद सध्या विरोधी पक्षांमध्ये असलेल्या पक्षांनी दाखवून झालेला आहे. विरोधी पक्षांमधला उन्माद पण जो पर्यंत कमी होत नाही तोपर्यंत बिहारच्या या निकालांची पुनरावृत्ती इतर ठिकाणी होईलच असं मानणं चुकीचं ठरेल.
बिहारच्या
निवडणूकीचं राष्ट्रीय आणि पक्षीय दृष्टीकोनातून विश्लेषण करणं चुकीचं ठरेल,
बिहारच्या निवडणूकीवर जातीचा पगडा साफ दिसून आला. हे कार्ड मोदी सुद्धा खेळले.
मोदींचं कार्ड चाललं नाही एवढंच. लालू प्रसाद यादव, राहुल गांधी यांचं राष्ट्रीय
राजकारणात कमबॅक झालं. केवळ विकास नाही तर या देशात सोबत जात ही लागते आणि त्याची
समिकरणं फिट्ट बसावी लागतात हा एक भीषण संदेश बिहारच्या मतदारांनी जाता जाता
दिलाय. नितिश कुमार यांनी सुद्धा ही निवडणूक राष्ट्रीय महत्त्वाची असल्याचं
म्हटलंय. देशाच्या निवडणूकांच्या इतिहासाचा अभ्यास या निवडणूकीशिवाय पूर्ण होऊ
शकणार नाही एवढं मात्र खरं.
@ravindraambekar
Comments