राज ठाकरेंच्या सोबत काही आमदार नियमित मातोश्रीवर जात असत, त्यातल्या काही लोकांना फोन करून विचारलं तर कळलं की राज मातोश्रीबाहेर गाडीतच बसून असायचे. त्यामुळे त्यांची तब्येत थोडी नरम आहे. कृष्णकुंज वरच्या एकाने तर सांगीतलं की मातोश्रीवर थोडं बिनसलंय, त्यामुळे आता डाॅक्टरांचा फोन आल्याशिवाय राज मातोश्रीवर जाणार नाहीत. राज घरून निघाले की समझा काहीतरी गडबड आहे. आमच्या रिपोर्टर श्रीरंग खरेने सुद्धा अशीच माहीती सांगीतली. शनिवारी दुपारी मी मातोश्रीबाहेर मिडीयाच्या कँप मध्ये जाऊन आलो, सर्व नाॅर्मल वाटलं. राजदीप सरदेसाईंचा मेसेज होता संध्याकाळी चार वाजेपर्यंतची वेळ क्रीटीकल आहे, मी आॅफिसला गेलो, डिप्लाॅयमेंट लावली. अडीच-तीनच्या आसपास राज ही घरून निघाला होता. बातमी जवळपास कन्फर्म असल्याचं इंडिकेटरच होतं. साडेतीनच्या आसपास सामना मध्ये फोन केला तेव्हा तिथल्या मित्राने आॅफिसला यायला सांगीतलं. मी पोहोचलो तेव्हा सामना मध्ये बातमी लिहीण्याचं काम सुरू होतं.
शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची काळजी संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहीली होती. मातोश्री बाहेर मिडियाचा गराडा पडला होता. ऐन दिवाळीत बाळासाहेबांच्या तब्येती विषयी अफवांना उधाण आलं होतं. शिवसेनेच्याच गोटातून उलट सुलट बातम्या येत होत्या. आणि अशातच गुरूवारी म्हणजे 15 नोव्हेंबर ला संध्याकाळी अचानक पोलिसांची वर्दळ मातोश्री परिसरात सुरू झाली. पोलिसांनी रस्ते बंद करायला सुरूवात केली. काही शिवसैनिक दारू पिऊन मातोश्रीवर पोहोचले. आम्ही कलानगरच्या गेट बाहेर ठिय्या देऊन बसलेलोच होतो. वर्दळ वाढली, शिवसेना नेते एकामागून एक मातोश्री वर पोहोचू लागले. गडबड कशासाठी आहे याची शहानिशा न करताच बाहेर जमलेल्या काही दारुड्या शिवसैनिकांनी कलानगर च्या गेट बाहेरील काही शिवसेना नेत्यांची दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारी होर्डींग्ज उतरवायला सुरूवात केली. गावभर फोनाफोनी करून दिवाळीचे कंदील बंद करण्याच्या सूचना दिल्या. कॅमेरासमोर एवढ्या गोष्टी होत असताना पत्रकार स्वस्थ कसे बसतील. काही विडीओ जर्नालिस्ट नी पोस्टर्स आणि होर्डींग्ज उतरवण्याच्या दारूड्या शिवसैनिकांच्या या कृत्याला कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला आणि हंगामा झाला.शिवसैनिकांनी मिडीयावर हल्ला केला. बाळासाहेबांच्या ढासळत्या प्रकृतीमध्ये मिडियाचा नेमका रोल काय हे बहुधा त्यांनाच माहीत असावे. कॅमेरामन ना मारहाण, ओबी व्हॅनची तोडफोड करूनही हे शिवसैनिक शांत झाले नाहीत. काही पत्रकार गर्दीमध्ये जाऊन उभे राहू लागले. मग तर एक नवीनच प्रकार सुरू झाला. पत्रकारांच्या फोनवर बोलण्याला आणि एसएमएस पाठवण्यावरही शिवसैनिकांनी आक्षेप घ्यायला सुरूवात केली. वातावरण चिघळत होतं. मातोश्री वर उभं राहणंही कठीण झालं. आत घडामोडी वाढत चालल्या होत्या, बातमीदारी कशी करायची हाच प्रश्न निर्माण झाला होता. प्रिंट वाल्यांचं ठिक आहे, इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये फुटेज नसेल तर दाखवणार काय.... पुन्हा बाळासाहेबांसारख्या नेत्याच्या तब्येतीविषयीची बातमी टाळायची तरी कशी...
कसं तरी करून, एडिशनल सीपी विश्वास नागरे पाटील, ब्रजेश सिंह यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला आणि मातोश्री बाहेर उभं रहायला जागा मिळाली. नेत्यांच्या मुवमेंटस कळत होत्या पण आत काय चाललंय ते कळत नव्हतं. रोज रात्री एक नवी अफवा थडकायची. मग नेत्यांना फोना-फोनी....मग सगळेच म्हणायचे..वाट पाहताय का...आता ह्या सगळ्यांना कसं सांगायचं की संपूर्ण भारतात अनेक लोकांना त्यांच्या तब्येतीविषयी जाणून घ्यायचंय आणि ही माहीती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय... त्याहुनही महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांपैकीच अनेकजण अफवाही पसरवत होते. त्यामुळे आलेली प्रत्येक बातमी खरी मानून तिची शहानिशा करणं आलंच.
तरी मातोश्री वरच्या नेमक्या घ़डामोडी बाहेर कळत नव्हत्या. राज ठाकरेचं येणं-जाणं सुरू असायचं. ते बाहेर पडले की मनसे आणि शिवसेनेच्या गोटातून काही-बाही बातम्या येत राहायच्या. एक अशीच बातमी आली की राज बराच वेळ मातोश्रीच्या बाहेर गाडीतच बसून राहायचे. आता त्यांना मातोश्री मध्ये जागा मिळत नव्हती की काय हे तेच सांगू शकतात. पण सहसा कुठल्याही मध्यमवर्गीय किंवा गरीब परिवारामध्येसुद्धा जर कुणी आजारी असेल आणि कोणी भेटायला कोणी आलं तर त्याला घराच्या बाहेर गाडीत बसायला कोणी लावत नाही. राजच्या संदर्भातल्या ह्या बातमीनंतर अफवांचा घोळ आणखी वाढला.मध्यरात्रिच्या सुमारास केव्हातरी राज मातोश्रीवरून बाहेर पडले. शुक्रवारच्या दिवशी राज मातोश्रीवर फिरकले नाहीत. काहीतरी गडबड असल्याची कुणकुण लागली होती, पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं. मध्येच मातोश्रीवर तैनात असलेला एक शिवसैनिक भेटला, बऱ्याच गप्पा झाल्यावर तो सांगायला लागला की जरा जयदेव शी बोलून घ़्या, बंगल्यावर काहीतरी वाजलंय. एक तर मुद्दा ठाकरे परिवाराचा, त्यात आताच्या क्षणाला असलं काही रिपोर्टींग करायचं म्हणजे घातकच. बाहेर तमाम शिवसैनिक बाळासाहेबांच्या तब्येतीच्या चिंतेने व्याकूळ झालेला, त्याला ह्यात कशातच रस नव्हता. त्यात आत नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नसल्याने हा मुद्दा सोडून दिला.
३ वाजून ३३ मिनिटांनी शिवसेनाप्रमुखांनी अखेरचा श्वास घेतला होता..पावणेचारच्या आसपास सहाराचे ब्यूरोचीफ मनोज भोयर यांचा ही फोन आला, साहेब गेले म्हणून...... एवढ्यात शिवसैनिक जितेंद्र जानावळेचा एमएसएस आला, बाळासाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरतीच आयोजन केलंय. मी त्याला रिप्लाय पाठवला, जितू आरती रद्द कर, मातोश्रीवर ये ... दिवा कधीचाच विझलाय!!
Comments