ये रे ये रे पावसा..तुला देतो पैसा... कंपाउंड मध्ये चिल्ल्या-पिल्यांचा कलबलाट.. प्रत्येक घरातून आयांचा दम..चल घरी ये..भिजू नको.. आजारी पडशील.. पावसाबरोबर येणारी वाऱ्याची थंडगार झुळुक..
आणि एवढ्यात समोर मस्त गरमागरम आंबोळ्या.... काहीच बदललेलं नाही.. या पेक्षा सुख आणखी काय असतं..
लहानपणापासून आता पर्यंत काहीच बदललेलं नाहीए...आयुष्याची सायकल अशीच चालत राहणार...
आज पाऊस पडायला लागण्याआधी मस्त सोनेरी प्रकाश पडला होता.. मोठ्यांना चिंता पाउस पडणार.. दोरीवर वाळत घातलेले कपडे पुन्हा ओले होणार.. मला चिंता आता कॅमेरामन आणि लॉजीस्टीक्स बरोबर रिपोर्टर्स ची एक बैठक लावावी लागणार लवकर.. नेहमीची पाणी तुंबणारे स्पॉटस नव्याने चेक करावे लागणार. वर्षभर ठिकठिकाणी अनेक बांधकामे झालीयत. त्यामुळे पाणी तुंबण्याचे नवीन स्पॉटस काय असावेत यावर ही काम करावं लागेल.. मनात अनेक विचार सुरू झाले लगेच... लगेचच पावसाचं हवे-हवेसे पण संपून गेलं.
मल्लिका मात्र पावसात चिंब भिजत होती.. पहिल्या पावसाबरोबर खाली आलेली धुळीचे कण, प्रदुषणकारी घटक... कसली कसली चिंता नाही... आई तिच्या मागे तिला घरी आणायला धावत होती...
मुलांच्या आमीषाला बळी पडून पावसही बरसत होता...पावसालाही चिंता नव्हती माझी लॉजिस्टीक्स आणि रिपोर्टर्स बरोबर मिटींग अजून झाली नाहीय त्याची...
Comments