प्रथा म्हणून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री विरोधी पक्षांना चहापानाला बोलावतात.. आणि प्रथा म्हणून विरोधी पक्ष चहापानावर बहिष्कार टाकतात.. प्रथा म्हणून आम्ही विरोधी पक्षनेत्यांच्या घरी दुपारचं जेवतो आणि मुख्यमंत्र्यांचा चहा प्यायला निघून जातो... सर्व काही प्रथेप्रमाणं...
विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद हा तसा गंभीर विषय असतो... पण आता तो गंमतीचा व्हायला लागलाय. गंमत काय आहे हे तुम्हाला कळावं म्हणून एक उदाहरण चिटकवूनच टाकतो.. जैतापूरच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला..जैतापूरबाबत काय भूमिका आहे...
* शिवसेनेचं उत्तर - आमचा प्रोजेक्टलाच विरोध आहे..
* मनसे चं उत्तर - आमचा प्रकल्पाला विरोध नाही..
एका नावेत बसून तीन दिशांना नाव वल्हवणारे नावाडी असल्यावर आणखी काय पाहिजे...।
बरं गंमत एवढ्यावरच संपत नाही ना.. शिवसेना आणि मनसे मध्ये टॉम एण्ड जेरी चा शो सुरू आहे.. बहुधा म्हणूनच सुभाष देसाईंना जर आपण ए टीम मानलं तर शिवसेनेनं आपली बी की सी टीम पाठवली होती.. रवींद्र वायकर, दीपक सावंत, विनोद घोसाळकर आणि उपनेत्या निलम गोऱ्हे... यंदा खिंड लढवण्याची जबाबदारी रवींद्र वायकर या नव्या खेळाडूवर सोपवण्यात आली होती आणि निलम गोऱ्हे - दीपक सावंत यांना त्यांच्या शेजारी कुजबूज करायला बसवण्यात आलं होतं.
मनसेच्या टीम मधून बाळा नांदगावकर आणि सरदेसाई होते.. तमाम विरोधी पक्षातील एकवाक्यता एव्हाना विज्युअलाइज झालीच असेल सर्वांना.. म्हणूनच प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी एकनाथ खडसे ''जेवण तयार आहे.. चला अशी पुस्ती जोडत होते.. ''
जपान मध्ये आलेल्या भूकंपामुळे शिवसेनेला जैतारपूर विरोधात लढण्यासाठी बळ मिळालंय.. म्हणूनच रवींद्र वायकरांनी तडाखेबाज फलंदाजी करत सरकार वर आसूड ओढले.. स्टँडींग कमिटीचं अनेक वर्ष चेअरमन राहिलेल्या वायकरांचं ''अंडरस्टँडीग'' चांगलच वाढलेलं आहे.. स्टँडींग कमिटी मध्ये आजवर त्यांनी जे काम केलंय त्याचा प्रभाव आजही त्यांच्या वागण्या-बोलण्यावर आहे... अलिबाबाने भाड्याने आणलेल्या भांड्यांना लावलेल्या मेणाला माणकं जशी चिकटली होती तशीच काही परिमाणं वायकरांनां ही चिकटली त्याला ते काय करणार.. म्हणूनच जपानच्या भूकंपाची तीव्रता ''रिश्टर स्केल'' मध्ये मोजण्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. ''अभिजात मराठीच्या'' संवर्धनासाठी पुढे सरसावलेल्या वायकरांनी मराठी ला ''8.9 हेक्टर'' भूकंपाचा धक्का देत मातोश्रीने दाखवलेला विश्वास अगदी सार्थ करून दाखवला...
नीलम गोऱ्हेंची कुजबूज एव्हाना थांबली होती.. आणि विनोद तावडे ही भूकंप मोजण्याची नवीन पट्टी शोधण्यासाठी निघून गेले. वायकरांच्या अभ्यासावर विश्वास असलेले दिवाकर रावतें सह अनेक नेते दुसऱ्या दिवशी अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकरांच्या व्याख्यानात झोपलेले आढळले..
विरोधक झोपलेले पाहून मग मुख्यमंत्र्यांनी ही डुलक्या काढल्या.. पण साला काय करणार कॅमेरा सुरूच राहिला ना.. आता वळसे पाटिल पुन्हा कॅमेरावर बॅन आणणार.. म्हंजे.. पुन्हा मिडीयालाच 8.9 हेक्टरचा धक्का .....
Comments