या महाराष्ट्राला आग लावा...!
जय महाराष्ट्र, दगडांच्या देशा कणखर देशा... बघतोयस काय रागानं महाराष्ट्र मिळवलाय वाघानं अशा विविध संदेशांनी आपली छाती फुगत चालली आहे असं वाटत असेल तर आपल्याच कानाखाली दोन चार चापटी मारून भानावर या. अशाच तुताऱ्यांनी या महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलंय. या तुताऱ्यांच्या आवाजाखाली अनेक आवाज दबले गेले आहेत. ते ऐकले तर आपण ज्याला अभिमानास्पद बोलतो तो अभिमान किती पोकळ आहे हे ही लक्षात येईल. एखाद्या चांगल्या दिवशी काही तरी वाईट बोलायची खोड असते काही लोकांना, तशी ती मलाही आहे. त्यामुळेच आजच्या चांगल्या दिवशी वाईट बोलायचं ठरवलंय.
सामान्यतः आपण ज्या भूप्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा अभिमान आपल्याला असतो. हा अभिमान कधी कधी त्या भूप्रदेशाच्या विकासाला दिशा देतो किंवा मग त्या प्रदेशातील अनेक गैरव्यवस्थांवर पांघरून घालायचं काम करतो. एकदा का हा अभिमान आपण स्वीकारला की मग अनेक गोष्टींची चर्चा करायची नाही आणि पुढे जायचं असं गृहीत धरलेले असते.
सामान्य माणूस सामान्यतः आपला फायदा काय होणार आहे याचा व्यापक किंवा सूक्ष्म हिशोब लाऊन आपापल्या कुवतीप्रमाणे आपला प्रकार निवडत असतो. महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यातील लोकांनी महाराष्ट्रीयन असल्याचा दुराभिमान स्वीकारलेला आहे. या दुराभिमानाच्या आड अनेक गैरव्यवस्थांना, समस्यांना, प्रश्नांना झाकून ठेवलंय. या पर्दानशी समस्यांचा पडदा- बुरखा काढायची कुणाची हिंमत होत नाही. इथेच या राज्याच्या ऱ्हासाची सुरूवात होताना दिसतेय.
विशिष्ट लोकांचं, विचारधारेचं सरकार आल्यावरच असं काही होतं का, तर ते तसं नाहीय. ही एक ऱ्हासाची सलग प्रक्रीया आहे. कुठलीच विचारधारा-पक्ष सध्या या प्रक्रीयेला तोडू शकत नाही. त्याची कारणे अनेकविध आहेत. सर्वांत मोठं कारण मला वाटतं की या राज्यातील लोकांना आता कसलाच राग येत नाही. अव्यवस्था, गैरकारभारभार हीच जणू व्यवस्था आहे असं मनोमनी मान्य केलं की नंतर प्रश्न पडण्याची, संताप येण्याची प्रक्रीया थंडावते, ती लोप पावत नाही, पण सुप्त स्वरूपात असते. पण आजची स्थिती जास्त भयावह आहे. ही संतापाची प्रक्रीया सामान्य माणूस रोजच्या रोज डिफ्युज करत चाललाय. त्याने आपला संताप- उद्वेग व्यक्त करण्यासाठी सोशल मिडीया सारखं एक माध्यम निवडलंय. वाळूत मुतलं ना फेस ना पाणी अशी काहीशी ही अवस्था आहे. यामध्ये व्यक्त होणाऱ्या भावना- संताप या तत्कालिक स्वरूपाच्या आणि कृतीची जोड नसलेल्या आहेत.
राज्यातील श्रमसंस्कृती ही त्या राज्याचं व्यक्तिमत्व घडवण्यात महत्वाचं योगदान देते. आज जागतिक कामगार दिवस ही आहे. महाराष्ट्राच्या श्रमसंस्कृतीची आज काय अवस्था आहे. कुठल्या कामगार चळवळी आज जीवंत आहेत. कामगारांचे कुठले लढे लढले जातायत, कुठले नवीन नेते पटलावर दिसतात... या प्रश्नांची उत्तरे नकारात्मकच येतील. याचा अर्थ प्रश्न संपले आहेत का, कामगारांना काही समस्या उरलेल्या नाहीत का? तर तसं नाहीय. उलट औद्योगिकरणानंतर कायद्यांमंध्ये ज्या सुधारणा कामगार हिताच्या म्हणून झाल्या त्यांचं पालन होताना दिसत नाही. कामगारांना बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. कामगार संघटनांचं धोरण मालकधार्जिणे होताना दिसतंय. नोकरीची भीती सतत असल्याने तसंच पर्यायी नोकर- कामगार मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने बंड निर्माण होण्याची शक्यताही मावळत चालली आहे.
कामगारांच्या प्रश्नांची चर्चा करता करता आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ज्या कारखानदारीच्या- उद्योगधंद्यांच्या जीवावर रोजगार निर्माण होतो त्या क्षेत्राचं काय? त्या क्षेत्राला सतत शोषक म्हणून पेश केल्यामुळे त्या क्षेत्राच्या समस्यांवर चर्चा होताना दिसत नाही. बडे भांडवलदार आणि उद्योग सोडले तर छोटा उद्योजक जगेल अशी स्थिती महाराष्ट्रात राहिलेली नाही. परमीट राज च्या विळख्यात उद्योग क्षेत्र आचके घेत आहे. अनेक उद्योग कर्नाटक, आंध्र आणि गुजरातेत निघून गेलेयत. अस्मितेच्या जाणिवा त्यांच्याही तितक्याच टोकदार असतील तरी त्यांनी आपल्याला ज्या भूप्रदेशाचा अभिमान वाटतो तो भूप्रदेश सोडला. त्यांना आपण महाराष्ट्रद्रोही मानणार का?
महाराष्ट्रातील छोटा शेतकरी विवंचनेत आहे. निसर्ग साथ देत नाही अशी एक ओरड आहे. जिथे निसर्गाने साथ दिली अशा भागांमध्ये रासायनिक कारखाने काढून तिथल्या जगण्याच्या पर्यायांवर ही आपण अतिक्रमण केलेले आहे. मराठवाड्यात उद्योग येऊ शकले नाहीत. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विंषय आपण सोडवू शकलेलो नाही. जवळपास सर्वच भागांमधला छोटा शेतकरी हा हलाखीचं जीवन जगतोय. काही अधिकारी चांगले आहेत. शेतकऱ्यांची संवाद साधतात, शेतकरी गट शेती करायला लागलाय, तरी सुद्धा काही ठराविक भाग सोडला तरी इतर भागांसाठी शेती हा आतबट्टयाचा व्यवसाय आहे. धनदांडग्यांना जिथे बँका रेडकार्पेट ट्रीटमेंट देतेस तिंथे लहान शेतकरी-उद्योजकाला बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये पदोपदी अपमान सहन करावा लागतोय.
अतिशय नाविन्यपूर्ण आणि चांगल्या योजना कमी कुस्तीच्या आणि चुकार अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे आणि सरकारच्या अनियमित अर्थपुरवठ्यामुळे कुचकामी ठरल्यायत. पोलीस हेच वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे मित्र आणि रक्षणकर्ते झालेयत. राजकारणातून नितिमत्ता रिटायर्ड झाल्यापासून सुमार दर्जाचे राजकारणी देशांचे आणि राज्याचं राजकारण चालवतायत. पत्रकारांच्या भूमिका आणि बातमीदारीवरही लोकांना संशय आहे. न्यायव्यवस्था दिवसेंदिवस पोकळ होत चाललीय. ज्यांना लौकिक अर्थाने सेंटर म्हणता येईल असे वकील - न्यायाधिश आपल्याला न्यायालयांमध्ये वावरताना दिसत आहेत.
या सर्व परिस्थितीचा राग संताप यावा अशी स्थिती असतानाही महाराष्ट्रातली जनता मात्र शांत आहे. तिला राग येत नाहीय. संताप येत नाहीय. कुठेच विद्रोह नाही. कुणी पेटून उठायला तयार नाही. वरवर लोकशाहीचा ढाचा कितीही मजबूत दिसू दे आतमधून हे सर्व पोखरलेलं आहे. वर लोकशाही आणि आतमध्ये अराजकता अशा या स्थितीत मला सर्वांत मोठा धोका हा अव्यवस्थेचा, अराजकतेचा वाटत नसून थंड बसलेल्या, संघर्ष विसरलेल्या आणि स्थितीप्रीय बनलेल्या समाजाचा वाटतो. या थंड समाजापासून बनलेल्या भूप्रदेशाला, ज्याला आपण राज्य म्हणतो .. महाराष्ट्र म्हणतो त्याची पेटून उठण्याची क्षमता नष्ट किंवा क्षीण झालीय. अशा राज्याला आता आग लावली पाहिजे, आणि ती कुणी तरी लावण्याची वाट पाहण्याएवजी त्याची सुरूवात आपल्यापासून झाली पाहिजे.
- रवींद्र आंबेकर, मॅक्स महाराष्ट्र रिसर्च ग्रुप
- @ravindraAmbekar
- Raviamb@gmail.com

Comments