हाफ चड्डी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वत:चा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. खाकी अर्धी चड्डी ही संघाची ओळख बनली होती. कालानुरूप त्यात बदल केला ही स्वागतार्ह गोष्ट आहे. तरूणांना आकर्षित करण्यासाठी किंवा आपण काळासोबत आहोत हे दाखवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे.
संघाने काळाची पावले उशीरा ओळखली. चड्डी बदलायला वेळ लागला. यावेळी देश आए आता दुरूस्त पण या असं आवाहन करण्याचा मोह अनेक पुरोगाम्यांना झाला. मला पण झाला पण मी तो आवरला. चड्डी हा केवळ संघाचा गणवेश नाही विचारधारेचं प्रतिक बनली होती. हा देश हाफ चड्डी वाल्यांच्या हातात देणार का ? असं एखादा नेतां भाषण करतो तेव्हा त्याचा अर्थ संघ असा असतो. त वरून ताकभात तसं चड्डी म्हटलं की संघी मानसिकता असं ओळखायचं. चड्डी वाल्यांच्या फुलपँटवाल्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसू शकता पण पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हाफचड्डी टेस्ट पास करावी लागते. हाफचड्डी ला जो जास्त शिव्या देईल तो जास्त पुरोगामी... असं काहीसं समीकरण डोक्यात असल्याने मोठी स्पर्धा लागलेली दिसते मधल्या काळात.
दरम्यानच्या काळात संघ वाढला, संघाचा प्रभाव वाढत असताना संघाला विरोध करणाऱ्या शक्ति वयोवृद्ध होत असल्यासारख्या वाटल्या. संघाच्या विरोधातला आवाज फार मोठा आहे, तरी पण संघाच्या एकवटलेल्या ताकदीपुढे तो क्षीण वाटतो.
चड्डी बदलली म्हणजे संघ बदलला किंवा बदलतोय असं मानायचं काहीच कारण नाही. गणवेशामुळे फार परिणाम होत असता तर खादीधारी आणि खाकी वर्दीधारींनी कधी भ्रष्टाचार केला नसता. आपल्याला नाविन्याचं वावडं नाही एवढंच दाखविण्याचा फार तर प्रयत्न म्हणावा.
हाफचड्डी बदलल्याने संघाचे विचारधारा बदलणार आहे का? कुणी महिला सरसंघचालक बनेल का? सदैव पिछडी जातींचा भाषणात उल्लेख असलेली भाषणं संघाचे नेते करतात, त्यांच्या अधिकारांबाबत कृती करतील का ? ज्यांनी धर्मांतरण केलेले नाही असा मागास समाज हिंदूच आहे, त्यामुळे त्या समाजाला समान अधिकार देणार का? हिंदूराष्ट्राच्या कल्पनेतून संघ बाहेर येणार का? मध्येमध्ये उगवणाऱ्या लव्ह जिहाद सारख्या विषयांवरून एकूणच मुस्लीम समाजाच्या विरोधात विष कालवणं थांबवणार आहे का? संघ खुल्या दिल्याने राज्यघटना मान्य करणार आहे का? असे अनेक प्रश्न माझ्या मनांत येतात. 'चड्डी नहीं सोच बदलतो' असं सांगीतल्याने काही बदल होणार आहे का? बरं असा सल्ला कुणी कुणाला द्यायचा, असा सल्ला द्यायचा नैतिक अधिकार इतर राजकीय पक्षांवर उरलाय का?
संघावर खूप आक्षेप आहेत. हिंदुत्वाच्या नावाने सतत हिंदूंना तलवारी परजत बसवायचे धंदे संघाने सोडले पाहिजेत. वाचाळ साधू- साध्वींच्या धर्मबुडव्या भाषणांवर अंकुश आणला पाहिजे. मी संघाला लाख सल्ले देऊ शकतो आणि माझं पुरोगामी असणे सर्टीफाईड करून घेऊ शकतो. पण माझे पुरोगामी चळवळींवर पण खूप आक्षेप आहेत. पुरोगामी असणाऱ्यांना सर्वच विषयांवर मतप्रदर्शाचं लायसन्स मिळालेलं असते. त्यामुळे आपला विचार खपत नाहीय याची चिंता करण्याएवजी दुसऱ्यांचा विचार कसा अविचार आहे हे सिद्ध करण्यातच सर्व वेळ आणि शक्ती वाया जाते. आपला विचार का वाढत नाहीय, आपल्या विचारांनी हाफचड्डी तर घातलेली नाहीय ना हे तपासलं पाहिजे. आपण ग्लोबल का होत नाही, जगभर आपले अनुयायी असावेत, मोठ्या संख्येंने त्यांनी समाजसुधारणा आणि राजकीय सुधारणांच्या कामात पोझीशन घ्यावी असं का पुरोगामी मंडळींना वाटत नाही?
संख्येचं,नाविन्याचं वावडं तर या चळवळींना नाहीय ना? नविन तरूण का येत नाही, विविध गटांमधले तेच तेच समविचारी एकत्र येऊन किती काळापर्यंत आपली ताकद वाढलीय असं "आल इज वेल.. आल इज वेल" चा धोषा लावणार आहेत. पुरोगामी चळवळींमध्ये नवीन विचार, नवीन मांडणी का येत नाही....आली तर ती वाढत का नाही.
बदलत्या काळाबरोबर पुरोगाम्यांचं अर्थशास्त्र का बदललं नाही असे अनेक प्रश्न मला पडतात. संघाने चड्डी बदलली आता पुरोगाम्यांनी सुद्धा आपल्या डोक्यातून हाफचड्डी काढून टाकावी.
रवींद्र आंबेकर
@ravindraAmbekar
Comments