डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या
निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने जागोजागी उभारलेले पंडाल-
लाऊड स्पीकर्स एव्हाना काढण्याचं काम सुरू असेल. साधारणत: एखादी व्यक्ती आपल्यात
नसली की तिची उणीव ही आपल्याला काही दिवस- काही महिने जाणवते आणि मग आपण आपल्या
कामाला सुरूवात करतो. पण जगाच्या इतिहासात अशीही एक व्यक्ती होऊन गेली की तिच्या
नसण्यानंतरही वर्षानुवर्षे तिचे अनुयायी तिच्यावरचं प्रेम-कृतज्ञता व्यक्त
करण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या
व्यक्तीचं नाव.
मध्यंतरीच्या काळात सोलापूरचे कलेक्टर
तुकाराम मुंढे यांच्याशी बोलत होतो. काय काय नवीन योजना राबवतायत म्हणून चौकशा करत
होतो. तेव्हा उल्लेखनीय बाब म्हणून त्यांनी ‘वर्गणीदादांना’ तंबी दिल्याची
गोष्ट सांगीतली. मी एकदा सोलापूरमधून आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी प्रवास करत
होतो. रात्री 12 वाजता एका रस्त्यावर माझी गाडी काही तरूणांनी अडवली होती. आंबेडकर
जयंतीची वर्गणी दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही म्हणत होते. 10-12 जण असतील. मी
वर्गणी देणार नाही म्हटल्यावर त्यांचा
आवाज चढला, ‘आमच्या जयंतीला वर्गणी कशी देत नाही तेच बघतो..’ वगैरे वगैरे.. गाडीच्या
डॅशबोर्ड वर बहिष्कृत भारत पुस्तकाची कॉपी होती. मी त्यांना म्हटलं माझ्यातर्फे हे
पुस्तक देतो, लायब्ररी मध्ये ठेवा पाहिजे तर. त्या मुलांनी पुस्तक घ्यायला नकार
दिला. मी पण जबरदस्ती त्यांच्या हातात पुस्तक कोंबत ड्रायवर ला गाडी काढायला
सांगीतली. माझ्याबरोबर घडलेला हा प्रसंग अनेकांनी अनुभवला असेल.
गल्लोगल्ली-दारोदारी निर्माण झालेले ‘वर्गणीदादा’ आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने लोकांकडून एवढे पैसे
उकळतात की त्यांना वर्षभर काम करावं लागत नाही असं मला एका रिपब्लिकन नेत्याने
सांगीतलं होतं.
मध्यंतरी प्रकाश आंबेडकर आणि मी युवकांच्या एका शिबीराला
मार्गदर्शन करण्यासाठी एकत्र होतो. तिथे प्रकाश आंबेडकरांनी तर उघड सांगीतलं की
केवळ वर्गणी गोळा करत बसू नका, डॉ. आंबेडकर वाचा. आंबेडकरांच्या आयुष्यासंदर्भात-
संघर्षासंदर्भात काही सोप्पे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारले त्याची उत्तरे
तिथल्या मुलांना देता आली नाहीत. मात्र जयंतीला वर्गणी गोळा करायला कोण कोण जातं
या प्रश्नाला बहुतेक सर्वांनीच हात वर केले होते. त्यामुळेच सोलापूरचे
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी नेमकं काय धाडस केलंय याचा मला अंदाज आला होता.
नेमकं लोक याला कसा प्रतिसाद देतात याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सोलापूरात गेलो.
शहराच्या सुरूवातीलाच शिवाजी पुतळ्याजवळ बाजू
बाजूला तीन-चार स्टेज होते. तिथून थोडं पुढे मग दलित बहुल वस्ती. प्रत्येक 50
फुटावर एक स्टेज... प्रत्येकाची आरास वेगळी. सगळेच स्टेज थेट रस्त्यावर. एका
मंडळाने स्टेज असा बांधला होता की उरलेल्या जागेतून गाडीच निघेना, पण बोलणार कोण.
रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष स्वामी वैदू सोलापूरातल्या याच वस्तीतले. ते भेटले.
स्वामी वैदूशी जयंतीच्या अर्थकारणावर बोललो. स्वामी वैदू नी सांगीतलेली माहिती
काही नवी नव्हती तरी धक्कादायक होती. “इथले नेते लोकांकडून जबरदस्ती पैसे उकळतात. दोन-पाच
लाखाच्या पावत्या पाडतात व्यापाऱ्यांच्या नावाने. नाही दिलं की त्रास देतात. म्हणून मी या
भानगडीतच पडत नाही. मी बाबासाहेबांना मानतो. माझ्या घरात त्यांचा फोटो आहे, म्हणून
माझ्या समाज मला मनापासून स्वीकारत नाही. आमच्या वैदू समाजातल्या लोकांच्या घरी
बाबासाहेबांचा फोटो नसतो.”
स्वामी वैदू सांगत होता. मी अनेकांना पाहिलंय. घरातले
पैसै खर्च करून सार्वजनिक स्वरूपात जयंती साजरी करताना. माझ्या एका सहकाऱ्याने जयंतीला
सुट्टी मिळत नाही म्हणून राजीनामा ही दिला होता. बाबासाहेबांवर प्रेम करणारी ही भोळी-भाबडी
जनता एकीकडे आणि जयंतीच्या निमित्ताने वर्गणी नव्हे खंडणी गोळा करणारे गावगुंड
एकीकडे. हे पाहिल्यावर अजून किती टप्पा गाठायचाय याचा अंदाज येतो. अशाप्रकारे
जयंती साजरी करू नका असा सल्ला प्रकाश आंबेडकरच देऊ शकतात, इतर कुणी दिला तर कितपत
रुचेल याची शाश्वती नाहीय, पण आता याचा विचार करायची वेळ आलीय.
थोड्याबहुत फरकाने हेच चित्र राज्यभर दिसतंय.
काही गावगुंडांना ‘ब्रँडींग’ हवं
असतं म्हणून ते बाबासाहेबांच्या फोटोसोबत आपले सोन्याने मढवलेले फोटो टाकून
होर्डींग लावतायत. पुण्यातून प्रवास करत असताना असे ‘बॉस, एस ग्रुप, जीएस ग्रुप, एकच पँथर’ टाइप होर्डींग अंगावर येत होते. अंगावर किलोभर सोनं,
गॉगल, गळ्यात बाबासाहेबांचा फोटो असलेला लॉकेट हे या पोस्टरछाप नेत्यांचं नवं
अस्त्र बनलंय. एवढे सगळे नेते दलित अत्याचाराच्या घटनांच्या वेळी, दलित समाजाच्या
शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या वेळी कुठे असतात हा पण प्रश्न पडतो. मला नेहमीच
खूप प्रश्न पडतात. दलित-मागास समाजासाठी बाबासाहेबांनी जो लढा दिला तो लढा अपूर्णच
राहिलाय असं वाटतं. नेमकं जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांची
आठवण काढत असताना, त्यांना अभिवादन करत असताना त्यांना समजून घेणं ही सुद्धा मोठी
गरज आहे असं वाटायला लागतंय.
सामान्यत: आपल्याला गणित विषय कठीण
वाटत असतो.. काहींना भाषा, काहींना इतिहास काहींना भूगोल.. माझं असं मत आहे की कधी
कधी सर्वांत सोप्पा विषय हाच सर्वांत कठीणही असतो. बाबासाहेबांचं तसंच आहे.
बाबासाहेबांना मानणाऱ्या आंबेडकरी जनतेलाही बाबासाहेब पूर्णपणे समजले नाहीत.
त्यामुळे सध्याच्या स्थितीत बाबासाहेब पुन्हा एकदा समजून घेण्याची स्थिती निर्माण
झालीय की काय असं वाटतंय. डॉ. बाबासाहेबांनी समाजातल्या त्या घटकाला आवाज दिला
ज्या घटकाला बाबासाहेब नसते तर कदाचित अजूनही जनावरांसारखंच जीवन जगावं लागलं
असतं. हे उपकार फार मोठे आहेत. बाबासाहेबांकडे दलित-सवर्ण तेढ निर्माण करणारे नेते
म्हणून कधी पाहिलं गेलं नाही. बाबासाहेबांनी दलित समाजाला या देशाच्या मुख्य
प्रवाहात आणलं. या कामात अनेक ‘ सवर्णांनी’ सुद्धा बाबासाहेबांना मदत केली, काहींनी विरोध ही केला.
बाबासाहेब हे एका समाजाचे कधीच नव्हते असं
आपण म्हणतो, पण तरी सुद्धा राज्यात फिरताना जाणवतं की अजूनही समाजाला बाबासाहेब
समजलेच नाहीयत. एक मागासवर्गीय अधिकारी सांगत होते की, एट्रॉसिटी लावण्याची धमकी
देऊन कामं करून घेणाऱ्या लोकल नेत्यांची- गुंडांची संख्या वाढतेय. त्यांना विरोध
केला की दलित विरोधी म्हणून बोंब मारतात आणि त्रास देतात. खरं तर बाबासाहेबांच्या
विचारांना बदनाम करणाऱ्या अशा नेत्यांना आता आंबेडकरी जनतेनेच धडा शिकवायला हवा.
जयंत्यामधला वाद कुठून निर्माण झाला.. ज्या माणसाने जगण्याचा मार्ग दिला त्या माणसाच्या जयंतीला
पोलीसांचा जादा बंदोबस्त, मिरवणूकींवर प्रतिबंध-निर्बंध हे कशाचं लक्षण आहे असा प्रश्न मला अनेकदा
पडतो. गावाच्या एन्ट्रीला शिवाजी महाराज आणि शेवटाला बाबासाहेबांचा पुतळा असं चित्र दिसलं की
मन अजून व्यथित होतं. अभ्यास-बुद्धीजीवी, चळवळीतले कोणी कार्यकर्ते यावर कितीही वाद
घालोत..बाबासाहेबांना समजून न घेताच आंधळेपणाने काही रूढी-परंपरा रूढ करण्याचा दलित
समाजामध्येही कल वाढतोय हे पाहूनही मन अस्वस्थ होतं. दलित समाज शिकतोय, त्याला विकासाची
एक नवीन दृष्टी मिळालीय, तो प्रगतीच्या वाटेवर चालू लागलाय अशातच आंबेडकरी विचारांना बदनाम
करणाऱ्या नव्या प्रवाहांकडे बघायला दलित नेत्यांकडे बहुधा वेळ दिसत नाहीय
Comments