मागच्या आठवड्यात पत्रकार संघात गेलो. सहज नाही, ठरवूनच..एक पत्रकार परिषद अटेंड करायला. पत्रकार परिषद होती मेधा ताईंची. मी काही कव्हर करायला गेलो नव्हतो, ताईंना भेटायचं होतं, बरेच दिवस झाले भेटलो नव्हतो, हेतू होता मेंदूतले ब्लॉकेज काढून मेंदूला जरा चालना मिळावी.. नर्मदे नंतर आता ताई मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नात गुतल्यायत. मला कससंच वाटलं.कससंच का वाटलं ते सविस्तर सांगेनच...
पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून ताई दुसरी कडे जाणार होत्या. ताईंच्या नेहमीच्या स्टाइलप्रमाणे त्यांनी जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांना स्टेज वर बसवलं होतं. बाकीचे अगदी स्वत:ची नैतिक जबाबदारी असल्याप्रमाणे प्रेसनोट वाटप आणि चहा वाटपाचं काम करत होतं. आंदोलनाचं सूक्ष्म नियोजन काय असतं ते इथं समजत. प्रत्येकाकडे काही ना काही काम असतंच.ताई मध्येच जाणार म्हणून माझीही चूळबूळ सुरू होती बाहेर पडण्यासाठी. म्हणून आधीच बाहेर पडावं म्हणून मी उभा राहीलो, तोच ताईंनी मला अडवलं.
मी लाजीरवाणं वाटून खाली बसलो. घाई मध्येही ताईंनी पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तर वीस मिनिटे उत्तरं दिली, आणि त्या निघाल्या..मी ही बाहेर पडलो.. बाहेर आल्यानंतर काही बोलावं, पुढच्या आंदोलनाचं नियोजन कसं काय हे जाणून घ्यावं असं मनात होतं, पण बाहेर येताच सीन काही वेगळाच होता. बाहेर 40-50 बायका आधीच ताईंची वाट पाहत उभ्या होत्या. बिल्डरने त्यांच्या झोपडपट्टीचं पाणी तोडलं होतं. एसआरए योजनेला विरोध केल्यामुळे बिल्डरने वस्तीचं पाणीचं तोडलं. मी राह्यलोय झोपडपट्टीमध्ये.. पाणी भरायला बाहेर सार्वजनिक नळ किंवा बोअरवेल.. पाणी नाही आलं तर काय होतं हे इमारतींमध्ये राहणाऱ्या माणसालाही समजतं. मग पाणी तोडण्याची दादागिरी या मुंबई मध्ये एखादा बिल्डर कसा काय करू शकतो हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. बिल्डर ही काय पाणी पुरवणं किंवा तोडणं याचा निर्णय घेणारी ऑथॉरिटी आहे काय..असे अनेक प्रश्न डोक्यात भुंगा होऊन फिरायला लागले. बरं हे काही मी पहिल्यांदा ऐकत किंवा बघत नव्हतो..।रवी भाऊ आपण बसा ना.. हे लोक पत्रकार परिषद पुढे सुरू ठेवतील. यांचंही ऐका..मला घाई आहे निघायचंय..
तरी सुद्धा प्रत्येक वेळेला एसआरए योजनेमध्ये झोपडपट्टीवासीयांना ज्याप्रमाणे वागवलं जातं ते ऐकून डोकं बधीर होऊन जातं. बरं आपण काय करणार यात. एसआरए योजनांच्या एवढ्या बातम्या केल्या की आता एकेक योजनेची वेगळी बातमीही करता येत नाही. आणि बातम्यांचा काय फायदा होणार.. ज्यांच्या कडे फिर्याद करायची तो एसआरए मध्ये कुठे ना कुठे कुठल्यानं कुठल्या बिल्डराचा पार्टनर निघतो.
सर्वच विकायला निघालेलं आहे. मेधा ताई मात्र यावर ही उपाय आहे असं सर्वांना सांगत लढण्यासाठी एक व्हा म्हणून समजावत होती. मध्येच कोणीतरी नवीन चर्चा सुरू केली होती, ताईंचं आंदोलन म्हणजे बिल्डर लॉबी च्या संघर्षातून सुरू झालेलं आंदोलन आहे..फंड बिल्डरच पुरवतायत..काय फायदा आहे फंडचा.. ताई कुठे गळ्यामध्ये '' पच्चास तोला'' सोनं मिरवते, कुठे बीएमडब्ल्यू मध्ये फिरते, जर हे काहीच करत नाही मग फंड चा काय फायदा.. लढण्यासाठी फंड नाही लोक लागतात. 25 वर्षे लोक पगार घेउन आंदोलन नाही करू शकत.. पगारी माणसं नोकरी करू शकतात, ती सुद्धा पुर्ण इमानदारीनं करतीलच अशी शाश्वती नाही. असो..
मी म्हणतं होतो की ताईंनी सुरू केलेलं हे नवं आंदोलन पाहून कससंच वाटलं. थोडंसं अवघडलो..अवघं आयुष्य गेलं ताईचं नर्मदेच्या खोऱ्यात... आदिवासींचा लढा लढण्यात.. आदिवासी जे सत्तेच्या गल्लीपासून खूप दूर असतात. त्यांना चेहरा नसतो.. आवाज नसतो... इथेही तीच परिस्थिती आहे.. बिनचेहऱ्याचा झोपडपट्टी वासी.. त्याची झोपडी अधिकृत करायची, मग तिथे त्याचं पुनर्वसन करायची योजना आणायची, त्याचे श्रम घ्यायचे आणि मग त्याची जागा लुटायची. अनधिकृत पणे राहणाऱ्या लोकांचं एक वेळ ठिक आहे, पण ज्यांना आपण अधिकृत केलंय त्यांची जमीन बळाचा वापर करून लुटायची ते ही सत्तेच्या गल्लीजवळ... सत्तेत बसलेल्या लोकांनीच..?
कससंच आणि अवघडल्यासारखं अशासाठी वाटलं की सत्तेत बसलेल्या दादांनी दादागिरी करत राहावी आणि ताई-अण्णांनी लढत रहावं.. ऊर फाटे पर्यंत...आणि आपण कव्हर कराव्यात दोघांच्याही पत्रकार परिषदा.. दगड बनून..........
Comments