पत्रकार दिनाच्या शुभेच्छा। आपणच आपली कधीतरी पाठ थोपटून घ्यायची संधी तशी फार कमी मिळते. पण कुणीतरी कान ही पिळायला हवा कधी तरी। ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय कमी झालेयत तसं, कान पिळू शकणारे हात कमी झालेयत, खेदानं म्हणावं लागतंय. पण वस्तुस्थिति आहे. त्याला काय करणार.
पत्रकारांना ज्ञान शिकवायची माझी औकात नाही. औकात शब्द ह्यासाठी वापरतो की आपण पत्रकार झाल्यानंतर आपल्याला पहिलं लाइसन्स मिळतं ते लोकांची औकात काढायचं. अनेक जण तर लोकांची औकात काढण हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे वागतात. आपल्याला पत्रकार म्हणून घटनेने काय अधिकार दिलेयत.. आपण जर पाहिलं तर पत्रकारांना कुठल्याही विशेषाधिकाराचं कवच घटनेने दिलेले नाही. एवढचं काय पत्रकारांना हल्ल्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून कायदा करावा, अशी मागणी झाली. मी त्या कायद्याचा मसुदा तयार करणाऱ्या समितीत होतो म्हणून मला बारकाईनं माहीत आहे सगळं, हा कायदा होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. पत्रकारांमध्ये पत्रकारांच्या व्याख्येवरून फुट पाडली, कुमार केतकरांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर तयार झालेली ही समिती पत्रकारांना दाखवलेल्या एका गाजरापेक्षा फार काही नाही याचा अंदाजही आपण घेऊ शकलो नाही. आता कायदा का होत नाही, संरक्षण का मिळत नाही, एकी का होत नाही..तर आपण बुद्धीजीवी आहोत.. आपण समाजाच्या दलित –शोषित, दबलेल्या समाजाचा आवाज आहोत. हा आवाज आपण सिस्टीम च्या विरोधात बुलंद करतो..कधी चांगल्या साठी कधी कधी हा आवाज उचलण्याचा स्वयंघोषित अधिकार आपल्याला आहे म्हणून स्वत:च्या फायद्यासाठी.. कशाला नाकारायचं.. कोण आहे इथे ज्याने सिस्टीम कडून फेवर घेतलं नाहीए. पण लागेल तेवढचं घेतलं पाहिजे..पोट फुटेल एवढं नाही... असो..। तर सिस्टिम च्या विरोधात आपण का असतो..कारण सिस्टिम तुमच्या आमच्यांचं भवितव्य कुठल्या अंगानं जावं याचा निर्णय घेत असते. तुमच्या आमच्या जीवनावर चांगला - वाईट प्रभाव टाकेल असे निर्णय घेत असते, वाईट निर्णयांच्या विरोधात मग काय आपण प्रत्येक वेळी आंदोलने करायची का.. रस्त्यावर यायचं का..कदाचित ते कुणाला शक्य होणार नाही. आणि म्हणूनच इथे पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकारीता हे अखंड चाललेलं आंदोलन आहे असं मला वाटतं. म्हणून आपल्याला प्रस्थापित होता येत नाही. आपल्यातला पत्रकार फारच स्ट्राँग झाला तरी तो एखादा उद्योग समूह नाही काढत, तो पेपर किंवा चॅनेल काढतो.. रक्तात भिनून गेलं एकदा की वेगळं नाही करता येत अशी नशा आहे.
मधल्या काळात देशातली संपूर्ण राजकीय आणि प्रशासकीय सिस्टीम संशयाच्या कल्लोळात अडकली. मिडीया ही काही वेगळी नाही. लॉबिंग प्रकरणातही मिडीयाचा रोल प्रामुख्याने समोर आला. विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहीलंय. अशा स्थितित मला वाटतं आता आपल्याला आपले रोल पुन्हा एकदा तपासून घ्यावे लागणार आहे. आता मिडीया हाउसेस कॉर्पोरेट झालीयत, पेपर, चॅनेल बरोबर वित्त संस्थांपासून म्युझिक हाउस पर्यंत सर्व व्यवसाय मिडीया हाउसेस चालवतायत. मग आपण खरचं कधी तरी निष्पक्ष राहू शकतो का. मला वाटत नाही, तसं... आपल्यावर प्रभाव राहणार आहेच.. पण म्हणून बातम्या दबतील असं कुणाला वाटत असेल तर ते अजिबात खरं नाही. आता अनेक नवी न माध्यमं येतायत. ब्लॉग, फेसबुक, ट्वीटर हे ही माध्यमेच आहेत. माहीतीची जेवढी देवाण-घेवाण या माध्यमांच्या मार्फत चालते तेवढी क्वचितच कुढल्या न्यूज पेपर, चॅनेलमध्ये येत असेल. मोदी, थरूर यांनी ट्वीटर चा वापर करत आपल्या भूमिका मांडल्या. प्रिती झिंटा एकदा दिल्ली एअरपोर्टच्या टॉयलेट मध्ये अडकून बसली होती. ट्वीटरने तिची सुटका केली. अनएडीटेट समोर येणारी ही माध्यमे आत्ताच मुख्य प्रवाहातील माध्यमांसाठी एक मोठी थ्रेट बनू पाहतायत. त्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे. माध्यमांच्या भाषा बदलतायत.. त्यावर अनेक सिनिअर लोक बोलतात नेहमी.. पण त्या भाषा आत्मसात केल्या पाहिजेत. माध्यमांमध्ये बोली भाषांबरोबरच बॉडी लँग्वेज ही विकास पावतेय, इलेक्ट्रॉनिक मिडीयाची देन आहे, आणि ती स्वीकारली पाहीजे.
पत्रकारिता पुर्वी बौद्धीक श्रमाचा विषय होता आता तो शारिरीक श्रमाचाही झालाय. आता तुम्हाला व्यक्तीश: फिल्डवर उभं रहावं लागतंय. धावपळ करावी लागतेय, त्यातून 32 शी नंतरच अनेक लोक फ्रस्टेट होउन रिटायर्डमेंट ची भाषा बोलू लागलेयत, स्टेबिलिटी ची भाषा बोलू लागलेयत, थोडा जास्त पैसा कमवावा म्हणजे पुढचं आयुष्य सुखात जाईल असाही विचार करू लागलेयत. हा विचार घातक आहे. प्रस्थापित होण्याकडे पत्रकाराचा कल झुकला की मग पत्रकारितेचं मातेरं झालं म्हणून समजा. व्यवस्थेशी समझोता केली की संपलच सगळं ना. थोडंसं इंटेलेक्च्य़ुअल होतंय, पण पर्याय नाही. आणखी पण काही बोलायचंय.. पण पार्ट – 2 मध्ये.. नोकरी आहे...काम पडलीयत...
Comments
aani patrakar dinachya hardhik shubhechha
kupachya kartutvala salam.....!